स्त्रीवादी चळवळींचा पराभव !

September 7, 2013 9:02 PM1 commentViews: 820

dipti_raut_ibn_lokmat_nashik- दीप्ती राऊत, ब्युरो चीफ, IBN लोकमत,नाशिक

नाशिकमधील मायको-बॉश कंपनीतील प्रशिक्षणार्थी प्रणाली रहाणेनं आत्महत्या केली. सहकाऱ्यांच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी तिने लिहिली होती. पोलिसांनी रॅगिंग विरोधी कायद्याखाली गुन्हा दाखल केला, संबंधित संशयितांना अटक करण्यात आली, कंपनीनेही याप्रकरणाची व्यवस्थापनाने गंभीर दखल घेतल्याचे प्रसिद्धीपत्रक जाहीर केले.

 

विषय इथे संपला नाही. प्रणाली प्रशिक्षणार्थी म्हणून का होईना, पण कर्मचारी म्हणून काम करीत होती. त्यामुळे याप्रकरणात विशाखा कायद्यानुसार कामाच्या ठिकाणच्या सुरक्षेच्या अनुषंगाने गुन्हा दाखल व्हायला हवा. त्यानुसार तो अद्याप झालेला नाही. संशयित आरोपी कंपनीतील कामगारांची मुले असल्याने कंपनी व्यवस्थापन आणि पोलिसही त्यांना पाठीशी घातल असल्याची प्रणालीच्या कुटुंबीयांची तक्रार आहे. त्याबाबतचा पाठपुरावा सुरू आहे.

 

या सार्‍यात एक अस्वस्थता कायम आहे. शुक्रवारी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघाला. प्रणालीच्या कुटुंबीयांसह बरेचजण त्यात सहभागी झाले होते. गोळा करून आणलेल्या गर्दीचा तो मोर्चा नक्कीच नव्हता. प्रणालीच्या आठवणीने सगळ्यांचे डोळे भरून आले होते. तिच्यावर झालेल्या अन्यायाने कंठ दाटले होते. तिने केलेल्या तोंडी तक्रारीची कशी दखल घेतली गेली नाही हे तिचे वडील कळवळून सांगत होते.

nasik raging

आमच्या प्रणालीची चूक काय, हा तिच्या बहिणीचा आकांत होता. शासन म्हणतं, मुली वाचवा, आम्ही मुलींना कसं वाचवायचं? तिची मावशी जाब विचारत होती. सगळ्यांचे मुद्दे बरोबर होते. कंपनी व्यवस्थापन, पोलीस यांच्याकडून आलेल्या निराशेनंतर दाद मागण्यासाठी हे सारे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन आले होते. पण मोर्चाचं बॅनर होतं –‘महाराष्ट्र राज्य बारा बलुतेदार संघ’. मोर्चाचा निरोप आला तेव्हा विचारले, मोर्चा कोण काढते आहे, तर उत्तर मिळालं होतं, ‘आमच्या समाजाच्या वतीनं’..

 

नाशिकमधील स्त्रीवादी चळवळीच्या पराभवाचंच हे जळजळीत वास्तव. एकेकाळी कुसुमताई पटवर्धन, शांताबाई दाणी यांच्या नेतृत्वाची परंपरा सांगणारे हे नाशिक. पण गेल्या काही वर्षांपासून नाशिकमधील स्त्रियांची प्रश्नांबाबतची सामाजिक चळवळी संपुष्टात आली आहे. दुसरीकडे स्त्रियांवरील, मुलींवरील अन्याय अत्याचारांची प्रकरणे वाढत आहेत. मात्र, त्याबाबत साधे निवेदन देण्यासाठीही सामाजिक संस्था-संघटना उत्फूर्तपणे पुढे येताना दिसत नाहीत. रस्त्यावर उतरून मोर्चा आणि दबाव गट तर फार दूरची बात. प्रियंका लकारियाचं अपहरण झालं. पोलिसांच्या तपासात हलगर्जी झाली.चार दिवसांनी बलात्कार केलेल्या प्रियंकाचा मृतदेह सापडला. नाशिकमध्ये मोर्चा निघाला नाही.

 

त्यानंतर अनेक अत्याचारांची प्रकरणं झाली, कुठे घरगुती अत्याचारांची, कुठे सामूहिक. अल्पवयीन मुलींवरचे बलात्कार, लहान मुली विकण्याचे प्रकार, फसवून लग्न लावण्याच्या घटना, आश्रमशाळांमधील विद्यार्थीनींवरील अत्याचार, वकील महिलेचा खून, देहविक्री करणाऱ्या महिलांवरील अन्याय, हुंडाबळी, मारहाण आणि कार्यालयीन शोषणाचे तर भरपूर प्रकार. बुवाबाजीनं ग्रासलेल्या महिलांची प्रकरणं, भपकेबाजीनं त्रासलेल्या महिलांच्या घटना. प्रियंका कांबळेच्या हत्येनंतर थोडी खळबळ झाली. पण त्यालाही जातपंचायतीच्या अत्यंचाराचा पदर होता, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नेतृत्वाचं पाठबळ होतं. तेवढाच अपवाद. सामाजिक संस्था संघटनांचं बळ खूप असतं. गेल्या वर्षी अल्पवयीन मुलींच्या विक्रीचं प्रकरण पुढे आलं होतं. आरोपीला अटक होत नव्हती. संस्था-संघटनांनी निवेदन दिलं, दुसऱ्या दिवशी अटक झाली. पण ही काही तुरळक उदाहरणं.

 

बाकी गुलाबी थंडीचा आस्वाद घेत नाशिक शांत बसलं आहे. तावातावानं चर्चा करतंय ते आपापल्या कंपूतच. बातम्या पाहून-वाचून ‘काय चाललं काय’ म्हणत थोडा वेळ अस्वस्थ होतंय ते तेवढ्यापुरतंच. प्रणालीच्या न्यायासाठी तिच्या ज्ञातीसमाजाचा मोर्चा निघावा आणि बाकी सामाजिक संस्था-संघटनांनी मूग गिळून बसावं यातच नाशिकमधील स्त्रियांसाठीच्या चळवळींचा पराभव स्पष्ट झालाय.

  • ashutosh

    pranali ne velich police complaint ka nahi keli….i quit mhanun sarva sankate par nahi hot mi manto ki pranali chi ji kahi chhalavnuk zali ti shama patra nahi….pan mulinihi khambir banle pahije…

close