गणपती बाप्पांचं उत्साहात आगमन

September 9, 2013 2:47 PM0 commentsViews: 701

ganpati bappa09 सप्टेंबर : गणपती बाप्पा मोरया..मंगलमूर्ती मोरया.. म्हणत ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळणं करत लाडक्या गणरायाचं आगमन झालंय. राज्यभरात आपल्या लाडक्या बाप्पा घरी आणण्यासाठी भक्तांनी बाजारात गर्दी केलीय. तर गणेश मंडळाचे मोठे गणपती रस्त्यावरून वाजत गाजत मंडळाच्या दिशेनं निघाले आहे. घरोघरी बसणार्‍या गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना झाली. गणेशमूतीर्ंसोबतच बाप्पाच्या पूजेसाठी लागणारं साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी झालीये. फुलबाजारातही गर्दी झालीये. तसंच गणपतीबाप्पाचे आवडते खास मोदक घेण्यासाठी मिठाईच्या दुकानात भक्तांनी गर्दी केलीय. संपूर्ण महाराष्ट्र आज गणेशमय झालाय.

राजकीय नेत्यांच्या घरी बाप्पांचं आगमन

 

राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वर्षा या निवासस्थानी आजसकाळी 10 वाजता गणपतीचं आगमन झालं. गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक पूजा केली. राज्यात समृद्धी,भरभराट, सुख शांती नांदो याकरीता मुख्यमंत्र्यांनी बाप्पांकडं साकडं घातलं. तसंच महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी गणेशोत्सावाच्या शुभेच्छा दिल्यात.
तर सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्रातील कोरड्या आणि ओल्या दुष्काळाचं संकट दूर व्हावं अशी गणपती बाप्पाकडे प्रार्थना केलीयं. तर शिवसेनेचे नेत मनोहर जोशी आणि भाजप नेते गोपीनाथ मंुडे यांनीही महाराष्ट्राच्या जनतेला गणेशोत्सावाच्या शुभेच्छा दिल्यात.

पुण्यात मानाच्या गणपतींचे आगमन

पुण्यातल्या गणेशोत्सवाची रंगत काही औरच आहे. ढोल-ताशांच्या गजरात ध्वज नाचवत पारंपारिक पध्दतीनं बाप्पांच स्वागत होतंय. भक्तांचा लाडका दगडूशेठ गणपती,देशातला पहिला भाऊ रंगारी आणि आराध्य दैवत मंडई गणपती यांच्याही मिरवणुकांनंतर प्रतिष्ठापना करण्यात आली. पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचीही प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यात मानाचा पहिला कसबा गणपती, दुसरा तांबडी जोगेश्वरी,मानाचा तिसरा गुरुजी तालीम,मानाचा तिसरा तुळशीबाग आणि मानाचा पाचवा केसरी वाडा या गणपतीच्या मिरवणुकाही वाजतगाजत निघाल्या. ढोल-ताशा आणि पारंपरिक वाद्यांची पथकं ही या मिरवणुकीची खास वैशिष्ट्य असतं.

 

ठाण्यात बाप्पा विराजमान

ठाण्यामध्येही गणपती बाप्पा मोरया…मंगलमूर्ती मोरयाच्या गजरात महाराष्ट्राच्या लाडक्या गणरायाचे स्वागत मोठ्या उत्साहात आणि आनंदात करण्यात आले. रविवारी रात्रीपासूनच आपल्या आराध्य दैवताला घरी घेऊन जाण्यासाठी भक्तगण आतुर झालेले दिसत होते. ठाण्यात गणेश चित्रशाळात गणेशभक्तांनी अलोट गर्दी केली होती. आता पुढचे 10 दिवस आपले बाप्पा आपल्या घरी राहणार याचा आनंद सगळ्यांचाच चेहर्‍यावर दिसत होता. सर्व आबालवृद्ध आपल्या बाप्पाचे साजिरे रुप आपल्या डोळ्यात साठवून घेताना दिसत होते.

कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह

संपूर्ण कोकणातही गणेशोत्सवाचा उत्साह संचारलाय. अस्सल पारंपरिक आणि घरगुती गणेशोत्सवाचं विशेष महत्त्व असणार्‍या सिंधुदुर्गातले गणेशभक्त नव्या शेता-भातातून आपल्या लाडक्या गणरायाला घरी घेऊन जातायत. प्रथेप्रमाणे गणरायाची दृष्ट काढून त्याला स्थानापन्न करत आहे. गणपतीच्या सजावटीसाठी लावली जाणारी माटवीही पारंपरिक पद्धतीनेच नव्याने रुजुन आलेल्या पाना फुलांनी सजवली जातेय. महागाईची झळ बसत असली तरीही कोकणात यंदा लाखोंच्या संख्येने चाकरमानी दाखल झालेत. आजपासून गौरी गणपतीच्या विसर्जनापर्यंत पुढचे पाच दिवस भजनं आणि लोककलांनी कोकणातला हा गणेशोत्सव बहरून जाणार आहे.

अकोल्यात इको-फ्रेंडली बाप्पांचं आगमन

अकोल्यातही आज विघ्नहर्त्या गणरायाचं उत्साहात आगमन झालं. गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा आज दुपारपर्यंतचा मुहूर्त आहे, त्यामुळे सकाळपासूनच बाजारात गणेशमूर्तीच्या खरेदीसाठी गर्दी केली होती. अकोल्यातल्या अशोक वाटिका चौकात गणपती मूर्तीची मुख्य बाजारपेठ आहे. तिथं आबालवृद्धांची गर्दी झाली होती. अनेक गणेशभक्तांनी गणराजाची वाजत-गाजत मिरवणूक काढली. विशेष म्हणजे गणेशभक्तांनी इको-फ्रेंडली असणार्‍या मातीच्या मूतीर्ंना मोठी पसंती दिल्याचं दिसत होतं.

कोल्हापुरात हेलिकॉप्टरमधून बाप्पा आले

कोल्हापुरात गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात झालीये. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गणेशोत्सवाचं आगमन उत्साहात झालं. शहरातल्या सार्वजनिक गणेशमंडळांनी मूर्ती आणल्यात. आज सकाळपासून घरगुती गणेशमूतीर्ंची प्रतिष्ठापना सुरु आहे. तर दुसरीकडे कागल तालुक्यातल्या हुंदरवाडी गावात चक्क हेलिकॉप्टरमधून गणेशमूर्ती आणण्यात आली. हेलिकॉप्टरमधून येणारे बाप्पा पाहण्यासाठी कागलवासियांनी गर्दी केली होती.

close