मुझफ्फरनगर हिंसाचारात मृतांचा आकडा 31 वर

September 9, 2013 9:42 PM0 commentsViews: 822

muzafar dangal09 सप्टेंबर : उत्तर प्रदेशातले मुझफ्फरनगर इथं मुलीच्या छेडछाडीवरून पेटलेल्या जातीय दंगलीत मृतांचा आकडा आता 31 वर पोहचलाय. या दंगलीत 100 हून अधिक जण जखमी झाले आहे. मुझफ्फरनगर आणि शामली हे दोन जिल्हे गेले 2 आठवडे जातीय दंगलीत होरपळत आहेत.

 

एका समाजातल्या मुलीच्या छेडछाडीवरून 27 ऑगस्ट रोजी शामलीजवळ तीन खून झाले आणि इथंच दंगलीची ठिणगी पेटली. त्यानंतर तर मुझफ्फरनगर सतत धुमसतोय. पोलिसांनी 10 सप्टेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश दिलेत. पोलीस महासंचालकही दंगलग्रस्त भागात तळ ठोकून आहेत. पण, तरीही गेल्या शनिवारी दंगल उसळली आणि दोन डझन निष्पापांचा बळी गेला.
दंगल टाळता आली असती?

 
– छेडछाडप्रकरणातून झालेल्या हत्येच्या आरोपींना लवकरात लवकर अटक करा, अशी मागणी 31 ऑगस्ट रोजी पंचायतीत करण्यात आली.
– 31 ऑगस्टला काढलेल्या रॅलीत 7 सप्टेंबरला महापंचायत घेणार असल्याची घोषणा करण्यात आली. म्हणजे सरकारकडे कारवाईसाठी पूर्ण एक आठवडा होता.
– शिवाय प्रतिबंधात्मक आदेश लागू असतानाही 7 सप्टेंबरच्या महापंचायतीसाठी हजारोच्या संख्येनं लोक कसे गोळा झाले. याप्रकरणी 90 लोकांना अटक करण्यात आलीय तर भाजपच्या 4 आमदारांवर गुन्हेही नोंदवण्यात आलेत.
तणाव निवळण्यासाठी खुद्द पंतप्रधानांनी यूपीला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलंय. तर यूपीच्या राज्यपालांनी राज्य सरकारला धारेवर धरणारा अहवाल केंद्राला पाठवलाय. तिकडे दंगलग्रस्त भागाला भेट देणारे भाजपचे रविशंकर प्रसाद आणि इतर नेत्यांना गाझियाबादच्या सीमेवरच अडवण्यात आलं. समाजवादी पक्ष सत्तेवर आल्यापासून संपूर्ण राज्यात एक डझनहून जास्त जातीय दंगली झाल्यायत. आता लोकसभा निवडणूक जवळ येतेय आणि केंद्रात 80 खासदार पाठवणार्‍या या राज्याला म्हणूनच अधिक महत्त्व आहे.

close