दिल्ली गँगरेप प्रकरणी चारही आरोपी दोषी,शिक्षेवर उद्या सुनावणी

September 10, 2013 1:01 PM1 commentViews: 304

delhi gan rape10 सप्टेंबर :दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणी साकेत कोर्टाने चारही आरोपींना दोषी ठरवलंय. फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालला. अवघ्या नऊ महिन्यांत कोर्टाने निकाल दिलाय. ‘निर्भया’ने मृत्यूपूर्वी दिलेला जबाब आणि फॉरेन्सिक अहवाल याच्या आधारावर या सर्वांना दोषी ठरवण्यात आलंय. आता या दोषींना काय शिक्षा करावी, यावर उद्या सकाळी 11 वाजता युक्तीवादाला सुरुवात होईल.

 

पवन गुप्ता… विनय शर्मा… अक्षय… आणि मुकेश… एका असहाय तरुणीवर पाशवी बलात्कार करणार्‍या या चारही नराधमांना अखेर त्यांच्या पापाची शिक्षा मिळणार आहे.
दिल्लीतल्या साकेत कोर्टाने चौघांनाही बलात्कार आणि खुनाच्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवलंय. या चौघांवरही सामूहिक बलात्कार, खून, अनैसर्गिक गुन्हा, दरोडा, अपहरण आणि पुरावे नष्ट करणं, हे एकूण 13 गुन्हे सिद्ध झालेत. पीडितेला ज्या गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या होत्या त्यावरून या सर्वांचा हेतू तिला ठार मारण्याचाच होता, असं कोर्टाने आपल्या निकालात स्पष्ट केलंय. पण, याप्रकरणी निष्पक्ष चौकशी झाली नाही. त्यामुळे हायकोर्टात अपील करणार असल्याचं आरोपींच्या वकिलांचं म्हणणंय. या दोषींच्या शिक्षेवर बुधवारी कोर्टात युक्तीवाद होईल. चौघांवरही खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्याने त्यांना फाशी द्यायची की जन्मठेप यावरच हा युक्तीवाद असेल. पण, त्यांना फाशीच व्हावी, अशी मागणी त्या बहादूर मुलीच्या पालकांनी व्यक्त केलीय.
तर बलात्कारविरोधी नवा कायदा झाल्याने आता या दोषींना फाशीच होईल,असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी व्यक्त केलाय. या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांची कारवाई, कायद्यात सुधारणेसाठी सरकारने दाखवलेली तत्परता आणि खटल्याची अवघ्या 9 महिन्यात पूर्ण झालेली सुनावणी यावरून अशाप्रकरचं अमानुष आणि घृणास्पद कृत्य करणार्‍याची गय केली जाणार नाही, हा कडक संदेश मिळालाय.

या खटल्यात साकेत कोर्टाने अतिशय कठोर निरीक्षणं नोंदवली आहे. या 237 पानी निकालातील महत्त्वाचे मुद्दे

 

 • - ज्या पद्धतीने रॉड वापरण्यात आले आणि पीडितेच्या शरीरावर जखमा करण्यात आल्या, त्यावरून हे सिद्ध होतं की रॉडचा वापर केवळ मुलीवर ताबा मिळवण्यासाठी करण्यात आला नाही. सामूहिक बलात्कारानंतर तिच्या शरीरात रॉड घुसवून तिचे अवयव हाताने बाहेर काढण्यात आले. यामागचा हेतू तिला ठार मारण्याचाच होता, हे सिद्ध होतं.
 • - त्यांनी याआधी एका माणसाला लुटलं होतं. त्यामुळे हे कृत्यही त्यांनी योजनाबद्ध पद्धतीनं केलं.
 • - त्यांना बसमधून बाहेर फेकून देण्यात आलं. यावरून त्यांना मारण्याच्याच हेतू होता, हे पुन्हा स्पष्ट होतं.
 • - तिच्या अवयवांना 18 जखमा झाल्या होत्या. यावरून तिला ठार करण्याचा उद्देश स्पष्ट होतो.
 • - या सर्व बाबी बघता हे कृत्य सुनियोजित होतं आणि ठार करण्याच्याच उद्देशानं ते करण्यात आलं, हे स्पष्ट होतं.
 • Guest

  चारी आरोपिना फाशीची शिक्षा व्हावी अस आपल सर्वांच मत जरी असल
  तरी न्यायालायाकडून चारी आरोपिना फाशी ऐवजी जन्मठेप आणि इतर
  शिक्षा होऊ शकेल असा आपला अंदाज आहे, जरी फाशीची शिक्षा दिली तर अशा
  प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळl, वचक बसु शकेल अस आपल्या सर्वांच मत
  आहे. धन्यवाद।

close