आरोपींना फाशी द्या, ‘निर्भया’च्या कुटुंबीयांची मागणी

September 10, 2013 3:34 PM0 commentsViews: 339

delhi gang rape victom10 सप्टेंबर : दिल्ली गँगरेप प्रकरणाच्या निकालाची आतूरतेनं वाट पाहणार्‍या ‘निर्भया’च्या आईने या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केलीय. या अगोदर अल्पवयीन आरोपीला ज्युईनाईल कोर्टाने तीन वर्षांचा शिक्षा सुनावलीय. कोर्टाच्या या निर्णयावर निर्भयाच्या कुटुंबीयांने नाराजी व्यक्त केली होती. या आरोपींनी फाशीची शिक्षा द्यावी जेणे करून बलात्कार करणार्‍या नराधमांना चाप बसेल अशी भावना निर्भयाचा आई-वडिलांनी व्यक्त केली.

“त्या रात्री ती दोन तासात परत येते असं सांगून घरातून बाहेर पडली ते दोन उलटलेही पण ती परत आली नाही. आजही मी तिची वाट पाहतेय.” 16 डिसेंबर 2012 च्या हिवाळ्यातल्या त्या काळरात्रीनं या आईचं सारं आयुष्यच बदलून गेलं. या भयानक घटनेच्या 9 महिन्यांनंतरही, पुरतं हादरून गेलेले हे कुटुंब अजून सावरलेलं नाहीय. आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यालाच आपलं पहिलं प्राधान्य असल्याचं या दुदैर्वी कुटुंबाचं म्हणणं आहे.

आम्हाला न्याय मिळेल यावर आमचा विश्वास आहे पण त्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी निर्भयाच्या वडिलांनी केली. त्या संतापजनक घटनेनंतर देशभरात निषेधाची लाट उसळली. त्यामुळेच हा लढा पुढे चालवण्यासाठी आपल्याला बळ मिळाल्याचं या कुटुंबीयांनी म्हटलंय. गेले काही महिने हे कुटुंब भावनिक संघर्षाला तोंड देतंय.राजकारण्यांची भेट, मीडियाला सामोरं जाणं, हे सर्व आलंच. काही काळानं आंदोलनाची धार कमी झाली…तरीही या कुटुंबाचा लढा मात्र सुरूच आहे. या सामूहिक बलात्कार प्रकरणातला क्रुरकर्मा आरोपी अल्पवयीन असल्यानं त्याला कडक शिक्षा मिळू शकली नाही…याची मोठी खंत त्यांना आहे.

या कुटुंबानं आपली लाडकी मुलगी गमावलीय. तिला न्याय मिळवून देण्यासाठीच आता त्यांचा लढा सुरू आहे. या प्रकरणातल्या इतर आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी, अशी त्यांची मागणी आहे.

close