विद्यार्थ्यांवर बोगस शस्त्रक्रिया करून कोट्यावधी लाटले

September 10, 2013 10:42 PM0 commentsViews: 769

10 सप्टेंबर : नंदुरबार जिल्ह्यात विद्यार्थ्यांवर बोगस शस्त्रक्रिया करून कोट्यावधी रुपयांचा मलिदा लाटण्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. गेली दोन वर्ष या चिमुरड्या विद्यार्थ्यांवर बोगस शस्त्रया झाल्या असून यात अनेकांना आपले अवयव गमवावे लागले. तब्बल 5 कोटी 68 लाखांचा हा घोटाळा झाल्याचं उघड झालंय. या प्रकरणी अजून गुन्हा दाखल झाला नसून 190 अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.
भ्रष्टाचाराचा भस्म्या लागलेल्या अधिकार्‍यांचा हा गैरव्यवहार अनेक विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतलाय. जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातल्या अनेरी ढोडियाच्या डोळ्यांवर अपंग विद्यार्थी म्हणून ऑपरेशन करण्यात आलं. पण ते चुकीचं आणि अर्धवट झालं. तेव्हापासून तिच्या डोळ्यांतून सतत रक्तस्राव होतोय. अशीच व्यथा इतरही अनेक विद्यार्थ्यांची आहे.

 

सर्व शिक्षण अभियनाअंतर्गत या विद्यार्थ्यांवर औरंगाबाद येथील दहिफळे हॉस्पिटलमध्ये संगनमताने विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्यात.कुणाला हात गमवावे लागले तर कुणाला पाय आता या गैरव्यवहाराची चौकशी सुरू झाली. या प्रकरणी 190 अधिकार्‍यांना दोषी धरण्यात आलं असून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीए. विद्यार्थ्यांवर दुरुस्ती शस्त्रक्रियांचे आदेशही देण्यात आले आहेत. पण लाल फितीच्या कारभारात अडकलेल्या या आदेशांमुळे या विद्यार्थ्यांना मात्र जगणं मुश्किल झालंय. मात्र या प्रकरणी अजूनही कुणावर गुन्हा दाखल झालेला नाही. या 190 अधिकार्‍यांकडून कारणं आल्यानंतर गुन्हा दाखल करणार असल्याचं जिल्हाधिकार्‍यांनी सांगितलं.

close