मोदींच्या उमेदवारीवरून भाजपचे तळ्यात मळ्यात

September 11, 2013 2:45 PM0 commentsViews: 372

Image img_187572_modi_240x180.jpg11 सप्टेंबर : भाजपमध्ये पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरुन सुरू असलेला संघर्ष अजूनही संपलेला नाही. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह, लालकृष्ण अडवाणी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. भाजपचे प्रचारसमितीचे प्रमुख नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्याचा निर्णय जवळपास निश्चित झालाय. संघानंही त्यांना हिरवा कंदील दाखवलाय.

 

पण, लालकृष्ण अडवाणी अजूनही त्यासाठी राजी नाहीत. वर्षाअखेरीस होणार्‍या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतरच पंतप्रधानपदाच्या उमेदवारीची घोषणा व्हावी असं अडवाणी, सुषमा स्वराज आणि मुरली मनोहर जोशी यांचं मत आहे. तर निवडणुकीच्या आधीच मोदी यांच्या नावाची घोषणा व्हावी असा दुसर्‍या गटाचा आग्रह आहे.

 

अरुण जेटली आणि व्यंकय्या नायडू या नेत्यांचा या गटात समावेश आहे. संसदीय मंडळाच्या बैठकीत मोदींच्या नावाची घोषणा होण्याची अपेक्षा आहे. पण, मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करताना सर्व नेत्यांमध्ये एकमत असावे असा राजनाथ सिंह यांचा आग्रह आहे.
भाजपमधल्या मोदीविरोधी गटानं 5 प्रश्न उपस्थित केलेत
1.आताच नरेंद्र मोदींच्या नावाची घोषणा केल्यास, विधानसभा निवडणुकांना मोदींच्या उमेदवारीच्या सार्वमताचं स्वरूप येणार नाही का?
2. मोदी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे डी.जी. वंझारांसारखे आणखी पोलीस अधिकारी समोर आले तर भाजप काय करणार?
3. लालकृष्ण अडवाणींना त्यांनी ठरवलेल्या वेळेस, मोदींच्या नावाची घोषणा करण्याचे अधिकार देता येणार नाहीत का?
4. भाजपनं आधी विधानसभा निवडणुका जिंकण्यावर लक्ष केंदि्रत करायला नको का?
5. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा कशी होऊ शकते? त्यांनी गुजरातची सत्ता दुसर्‍या कोणाकडे सोपवून प्रचाराची धुरा सांभाळायला नको का?

close