नियमबाह्य फाईलींना वेळ लागतो,मुख्यमंत्र्यांचा पवारांना टोला

September 11, 2013 6:37 PM4 commentsViews: 1156

cm on pawar11 सप्टेंबर : मलाही आघाडी सरकार चालवायचं आहे. त्यामुळे जे काही नियमबाह्य कामकाजाच्या फाईली असो अथवा वैयक्तिक काम  त्यासाठी नियमानुसारच काम करणार असा सणसणीत प्रतिटोला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवारांना लगावला. तसंच आघाडी सरकार चालवायचं त्यामुळे योग्य वेळी योग्य उत्तर देऊ असंही मुख्यमंत्री म्हणाले.

 
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांवर हल्लाबोल केला. प्रलंबित फाईल्सवरून नाव न घेता त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांवर धारदार टीका केली. पण शरद पवारांचा हा कळवळा लोकहिताच्या प्रश्नांसाठी नसून खाजगी कंपन्यांच्या हितासाठी आहे, असा युक्तिवाद आज काँग्रेसने केलाय. त्यामुळे निवडणुका वर्षभरावर आल्या असताना पुन्हा एकदा आघाडीतल्या मित्रपक्षांचं शत्रुत्त्व जगासमोर उघड झालंय.

 
शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण..दोघांच्या नात्यातला अविश्वास सर्वांना माहितीये. पण विलासराव देशमुखांच्या चरित्राच्या प्रकाशनाच्या वेळी ही धुसफूस जगासमोर आली. विलासरावांच्या कार्यशैलीचं गुणगान करताना शरद पवारांनी जाणीवपूर्वक प्रलंबित फायलींच्या मुद्द्याला हात घातला आणि मुख्यमंत्री चव्हाणांवर निशाणा साधला.
गेल्या अडीच वर्षांत याच प्रलंबित फायलींच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. तेव्हा मुख्यमंत्री शांत बसले होते. पण शरद पवारांनी थेट हल्ला केल्यावर मुख्यमंत्र्यांनीही धारदार पलटवार केलाय. खासगी हिताच्या आणि नियमबाह्य प्रकल्पांच्या फाइल्सबद्दल निर्णय घ्यायला वेळ लागतो असा सणसणीत प्रतिटोला त्यांनी शरद पवारांना मारला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महत्त्वाच्या फायली मुख्यमंत्री कार्यालयात निर्णयाविना पडून आहेत.

 

रखडलेला समन्वय

 • - लवासाप्रकरणी विशेष नियोजन प्राधिकरण नेमण्याची फाईल
 • - वांद्र्याच्या सरकारी वसाहतीच्या पुनर्विकासाचा रखडलेला प्रश्न
 • - MSRDCच्या मुंबईतल्या पायभूत प्रकल्पांची फाईल
 • - दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातले हॉल्स खासगी हॉटेल्सना भाड्याने देण्याच्या प्रस्तावाची फाईल
 • - तसंच मंत्रालयामागच्या विस्तारित इमारतीच्या पुर्नबांधणीची फाईल

 

दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयानं मात्र पवारांचा दावा खोडून काढलाय. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार…

 • - मुख्यमंत्र्यांकडे एकूण फाईल्स : 27,701
 • - सही झालेल्या फाईल्स : 26,551
 • - पेंडिंग फाईल्स : 1400

 

निवडणुका काही महिन्यांवर आल्या असल्यामुळे आपपल्या फाईल्स लवकर मंजूर व्हाव्यात, यासाठी जो तो प्रयत्न करतोय. त्यामुळे एकमेकांवर दबाव आणून आपापल्या हिताचे प्रश्न मार्गी लावण्याचा आणि त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्नही दोन्ही बाजूंनी होताना दिसतोय.

 

 • शाम जाधव

  एवढेच एकमेकांचे पटत नाही तर सत्ता सोडा पण नाही मेवा खायचा आहे त्यामुळे जनतेच्या नावाखाली स्वतःचे फायदे करून घायचे.निवडणुकांना थोडा कालावधी राहिला म्हणून एकमेकांना पाण्यात पहायचे आणि गरिबांच्या हिताच्या नावाखाली गरीबांचा पुळका दाखवायचा .

  • लोभ नसावा.

   अरे भाऊ अन्न सुरक्षा कायदा आला आता दारिद्र रेषे खाली जा व स्वत:धान्य मिळवा.

 • लोभ नसावा.

  म्हणजे मुख्यमंत्री साहेब आपले सरकार नियम बाह्य फाईलीचे काम करतात तर…!
  फक्त वेळ लावतात असेच ना.
  जशी प्रशासनाला सवय लागली आहे,
  संपुर्ण महाराष्ट्रात.!
  कि काही घेल्याशिवाय काही द्याचे नाही
  वारे सरकार….

 • shashig

  मी कायमच युतीच्या विचारांचा आहे व त्यांचाच मतदार राहिलो आहे.

  तरीही मला असे वाटते की पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राच्या इतिहासात कित्येक वर्षांनी अभिमान वाटावे असे मुख्यमंत्री लाभले आहेत.
  येत्या निवडणुकीत जर कॉंग्रेसने चव्हाणांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार
  म्हणून घोषित केले तर मी लोकसभेसाठी युतीच्या उमेदवाराला मतदान करीन पण
  विधानसभेला चव्हाणांना पुन्हा संधी मिळावी म्हणून कॉंग्रेसच्या उमेदवाराला
  मतदान करीन.

  ज्याची “त्या” पद्धतीची कामे अडकली आहेत तो कांगावा करणारच. बाकी काय….

close