कसाब ठार झाल्याचा पाकिस्तानचा दावा

January 30, 2009 3:17 PM0 commentsViews: 3

30 जानेवारी मुंबई हल्ल्याच्या तपासाबाबत पाकिस्तानकडून उलटसुलट विधानं केली जात आहेत. पाकिस्तानचे भारतातले उच्चायुक्त एस एम कुरेशी यांनी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांची भेट घेऊन मुंबई हल्ल्याच्या तपासाबद्दल माहिती दिली. पण, ही केवळ औपचारिक भेट होती, असं पाकच्या उच्चायुक्तालयानं आता स्पष्ट केलंय. यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान गिलानी यांनी डावोसमध्ये बोलताना मुंबई हल्ल्यातल्या दोषींविरोधात कडक कारवाईचे संकेत दिले होते. तर पाकच्या एका वरिष्ठ अधिका-यानं 26/11 तल्या आरोपींना शिक्षा करण्यात येणार असल्याचं सांगितलंय. ही कारवाई सायबर क्राईमच्या लॉनुसार होणार आहे. कारण मुंबई हल्ल्यातल्या अतिरेक्यांनी इंटरनेटचा वापर केल्याचे पुरावे आहेत. पण लंडनमधल्या पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनी मात्र या सर्वांना छेद देणारं वक्तव्य केलं आहे. मुंबई हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध असल्याचं त्यांनी सरळ धुडकावून लावलंय. याबाबत कोणतेही पुरावे नसल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान मुंबई दहशतवादी हल्ल्यातला दहशतवादी अजमल कसाब, जिवंत असल्याचं गृहमंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय.अजमल कसाब ठार झाल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात येत होता. हा दावा चुकीचा असल्याचं जयंत पाटलांनी म्हटलं आहे.मात्र याबाबत पाकिस्तानकडून कुठलीही अधिकृत माहिती मिळाली नसल्याचं प्रणव मुखर्जी यांनी सांगितलं आहे. याबाबत मीडियाकडून बातम्या आलेल्या आहेत. एखाद्या देशाची वागण्याची ही पद्धत योग्य नाही. पाकिस्ताननं मुंबई हल्ल्याप्रकरणी योग्य तपास करावा, अशी आमची अपेक्षा आहे असे ते म्हणाले.

close