मोदींच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये मतभेद कायम

September 12, 2013 3:15 PM0 commentsViews: 477

advani on modi12 सप्टेंबर : भाजप प्रचार समितीचे प्रमुख नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा करण्याच्या मुद्द्यावरून भाजपमधला वाद अजूनही सुरूच आहे. संघाने मोदींच्या नावावर शिक्कामोर्ताब केल्यानंतर भाजपने आता निर्णय घ्यावा अशी मागणी केली.

 

मात्र भाजपच्या गोटातून जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी मोदींच्या नावाला विरोध केलाय. त्यांच्यापाठोपाठ आता सुषमा स्वराज यांनीही मोदींच्या नावाला विरोध दर्शवला आहे. त्यांची समजूत काढण्यासाठी पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह हे सुषमा स्वराज यांची भेट घेणार आहेत.

 

विधानसभा निवडणुकांपूर्वी मोदी यांच्या नावाची घोषणा केल्यास, मोठ्या प्रमाणात धृवीकरण होईल, असा अडवाणींचा आक्षेप आहे. राजनाथ सिंह यांच्याबरोबर झालेल्या भेटीत अडवाणी यांनी ही गोष्ट स्पष्ट केलीये. तर दुसरीकडे, मोदींना विरोध करत असल्याबद्दल बिहारमधील भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्यावर टीका केली.

 

अडवाणी हे जनभावनेपासून दूर असल्याचं सुशीलकुमार मोदी यांनी म्हटलंय. तर मोदी यांनी देशाप्रमाणेच भाजपमध्येही धृवीकरण घडवून आणल्याची टीका अडवाणी यांचे निकटवर्तीय सुधींद्र कुलकर्णी यांनी केलीये. दरम्यान, पक्षात कोणीही नाराज नाही, पंतप्रधानपदाचा उमेदवार योग्य वेळी घोषित करू असं राजनाथ सिंह यांनी म्हटलंय.

close