राजकुमार धूत यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

September 12, 2013 2:17 PM0 commentsViews: 667

rajkumar dhootऔरंगाबाद, 12 सप्टेंबर: शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार राजकुमार धूत यांच्यावर विनयभंगाचा आरोप करण्यात आलाय. धूत यांच्याविरोधात मुकुंदवाडी पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

 

राजकुमार धूत यांचे खाजगी अंगरक्षक गेल्या 3 वर्षांपासून गायब आहेत. या अंगरक्षकाच्या पत्नीनं नवर्‍याबद्दल खासदारांकडे अनेकवेळा चौकशी केली. खासदार धूत आपल्या चौकशीला समाधानकारक उत्तर देत नव्हते, असं या महिलेचं म्हणणं आहे. नेहमी होणार्‍या चौकशीला कंटाळून खासदारांनी आपल्या घरी येऊन आपल्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला, तसंच विनयभंगाचा प्रयत्न केला असं या महिलेनं आपल्या तक्रारीत म्हटलंय.

 

महिलेने पोलिसात तक्रार करण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांनी तिची तक्रार घेतली नव्हती. अखेर जेएमएफसी रेल्वे कोर्टाच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतलाय. मात्र,धूत यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहे. या महिलेचे सर्व आरोप बिनबुडाचे असून निर्दोषत्त्व सिद्ध करणारे पुरावे असल्याचा दावा धूत यांनी केला.

खा.राजकुमार धूत यांचं स्पष्टीकरण

“या महिलेने केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. माझं निर्दोषत्त्व सिद्ध करणारे पुरावे माझ्याकडे आहेत. आणि मला खात्री आहे की, पोलीस तपासात सत्य सर्वांसमोर उघड होईल. सदर महिलेनं 2007पासून कंपनीच्या अनेक अधिकार्‍यांविरुद्ध तक्रारी दाखल केल्या आहेत. ही महिला या तक्रारी घेऊन कोर्टात गेली होती. त्यावेळी दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टानं दोनही वेळा हे प्रकरण फेटाळून लावलं होतं.”

 

धूत यांच्यावरचे आरोप
– राजकिशोर कुँवर हे राजकुमार धूत यांचे खासगी अंगरक्षक होते
– 29 जुन 2007 पासून ते बेपत्ता आहेत
– धूत यांच्या दिनेश आणि करीम नावाच्या पीएनी कुँवर यांना घरातून बोलावून नेलं
– साहेबांनी बोलावलंय असं सांगून कुँवर यांना नेल्याचा कुँवर यांच्या पत्नीचा आरोप
– 30 जुन 2007 – पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल
– तक्रार केल्यानंतर धूत यांच्या माणसांनी धमकावल्याचा महिलेचा आरोप
– 3 ऑगस्ट 2013 – राजकुमार धूत, इतर दोघांनी रात्री घरात घुसून धमकावल्याची तक्रार
– मारहाण आणि विनयभंग केल्याची तक्रार
– 4 ऑगस्ट 2013 – पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली नाही
– 5 आणि 6 ऑगस्ट 2013 – रजिस्टर पोस्टानं सीपी आणि पोलीस स्टेशनला तक्रार केली
– 7 ऑगस्ट 2013 – सीपींची भेट घेण्याचा प्रयत्न, पण भेट मिळाली नाही
– 17 ऑगस्ट 2013 – जेएमएफसी कोर्टात याचिका दाखल केली

close