गणेश निधी: त्यांच्या ‘प्रयोगभूमी’ला हवी मदत

September 12, 2013 10:41 PM0 commentsViews: 120

दिनेश केळुसकर,रत्नागिरी
12 सप्टेंबर : वंचित समाजातील मुलं शिक्षणाबाहेर राहण्याची अनेक सामाजिक आणि आर्थिक कारणं आहेत. पण मुख्यत: या समाजांचं सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक वेगळेपण लक्षात न घेता दिलं जाणारं साचेबंद शिक्षण अशा समाजातल्या मुलांना आकर्षित करत नाही. नेमकी हीच गरज ओळखून चिपळूणच्या ‘श्रमिक सहयोग’ या संस्थेने गेल्या आठ वर्षांपासून कोकणातल्या अलोरे जवळ शिक्षणाची एक आगळी वेगळी प्रयोगभूमी सुरू केलीय.

सामाजिक कार्यकर्ते राजन इंदूलकर यांची श्रमिक सहयोग संस्था 2005 पासून प्रयोगभूमी ही शाळा चालवतेय. कातकरी-आदिवासी आणि गवळी-धनगर या दोन समाजातल्या मुलांच्या शिक्षणाचं प्रयोगशील काम ही संस्था करते. या अनौपचारिक शाळेत सुरुवातीला ह्या मुलांना शिकवताना त्यांच्या काथोडी, धनगरी अशा बोलीभाषांचाच आधार घेतला जातो. एकूण 35 मुलं या प्रयोगभुमीत मोफ त निवासी शिक्षण घेतायत. या मुलांकडे असलेल्या उपजत व्यवसाय कौशल्यालाही वाव देऊन शेती, दुग्ध व्यवसाय, मत्स्यपालन असे उपक्रमही ही संस्था राबवतेय.
‘आमनी भाषा, आमना जीवन इसाच राखी ठेविहीन आमना शिकूला हा..’भाषा संस्कृती आणि जीवन शाबुत ठेवून या मुलांना या प्रयोगभुमीत निसर्गाच्या कुशीत दिलं जाणारं शिक्षण त्यांच्या जगण्याची समज तर वाढवणारं आहेच पण त्यांच्या प्रगतीच मार्गही खुला करणारं आहे.
या शाळेला मदत करण्याचं आवाहन आम्ही करतोय. वंचित घटाकातल्या मुलांना शिक्षण मिळावं, यासाठी काम करणार्‍या ‘श्रमिक सहयोग’ या संस्थेला मदत करायची असेल तर पत्ता आहे:
 मदतीसाठी संपर्क
श्रमिक सहयोग, नोंदणी क्र. F435/Rtn
सती, मु.पो.पिंपळी खुर्द,
ता. चिपळूण, जि. रत्नागिरी.
पिन कोड 415 604
दूरध्वनी : ( 02355) 256027 /256004
Email : shramik2@redifffmail.com

close