मोदींच्या उमेदवारीची आज घोषणा?

September 13, 2013 12:28 PM0 commentsViews: 448

gujrat narendra modi13 सप्टेंबर : भाजपचे प्रचारप्रमुख आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा करण्यासाठी भाजपच्या नेत्यांच्या हालचाली सुरु आहेत. एकीकडे नाराज लालकृष्ण अडवाणींची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

 

तर दुसरीकडे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिल्लीला येण्याचं टाळलंय. राजनाथ सिंह यांनी चौहान यांना दिल्लीला येण्याची विनंती केली होती. ती त्यांनी फेटाळून लावलीये. यामुळे मोदींना पक्षातूनच असलेला विरोध पुरता शमलेला नाही, असंच चित्र दिसतंय. तर, मोदींना सर्वांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपच्या नेत्यांचा भेटीगाठीचा सिलसिला आजही सकाळपासून सुरुच आहे.

 

मुरलीधर राव आणि एस गुरुमूर्ती हे दोन्ही गटांशी चर्चा करण्यासाठी दुवा म्हणून काम करत आहे. काही वेळापूर्वी अडवाणींची समजूत काढण्यासाठी माजी पक्षाध्यक्ष नितीन गडकरींनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यापूर्वी आज सकाळी संघाचे नेते रामलाल आणि माजी पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांनी भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. त्यामुळे त्यांच्या नावाची घोषणा ही फक्त औपचारिकता शिल्लक असल्याचं मानलं जातंय.

close