फिक्सिंग भोवली, श्रीशांत-अंकित चव्हाणवर आजीवन बंदी

September 13, 2013 5:41 PM0 commentsViews: 423

shreeshant and ankit13 सप्टेंबर : भारतीय क्रिकेट जगताला हादरा पोहचवणार्‍या आयपीएल-स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अखेर दोषी खेळाडूंवर कारवाईची कुर्‍हाड कोसळलीय. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अडकलेले राजस्थान रॉयल्सचे खेळाडू श्रीशांत आणि अंकित चव्हाणवर आजीवन बंदी घातली आहे. आज दिल्लीत बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

 

फिक्सिंगप्रकरणी नेमण्यात आलेल्या रवी सवानी समितीचा चौकशी अहवाल या बैठकीत ठेवला गेला. या अहवालानुसार ही कारवाई केली गेलीये. या निर्णयानुसार आता श्रीशांत आणि अंकित चव्हाण बीसीसीआयच्या कोणत्याही स्पर्धेत खेळू शकणार नाहीत. राजस्थान रॉयल्सचा दुसरा बॉलर सिद्धार्थ त्रिवेदी ज्यानं बुकीजशी संपर्क झाल्याची कबुली दिली होती, त्याच्यावर एका वर्षाची बंदी घातली गेली आहे.

 

राजस्थानकडून 2012 पर्यंत खेळणार्‍या अमित सिंगवर पाच वर्षांची बंदी घातली गेलीये. तर हरमीत सिंगला पुराव्याअभावी क्लीन चिट देण्यात आलीय. राजस्थान रॉयल्सचा तिसरा दोषी खेळाडू अजित चंडिलाला नुकतीच बेल मिळालीये त्यामुळे त्याची चौकशी केल्यानंतर त्याच्यासंदर्भात बीसीसीआय आपला निर्णय देईल. आयपीएलच्या सहाव्या हंगामात श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला यानी टॉवेल, चेनच्या इशार्‍यावर स्पॉट फिक्सिंग केल्याचं दिल्ली पोलिसांनी उघड केलं होतं. या प्रकरणाचे धागेदोरे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमपर्यंत पोहचले. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात दाऊदची नाव आहे.

close