स्वयंसेवक ते पंतप्रधानपदाचे उमेदवार !

September 14, 2013 1:45 PM0 commentsViews: 2062

14 सप्टेंबर : भाजपच्या घोषणेनंतर नरेंद्र मोदींनी आता देशाचे पंतप्रधान बनण्याच्या मार्गात एक पाऊल पुढं टाकलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक ते गुजरातचे मुख्यमंत्री आणि आता पंतप्रधानपदाचे उमेदवार..मोदींची राजकीय कारकीर्द विलक्षण आहे. स्वतःला राष्ट्रीय नेता बनवण्यासाठी मोदींनी गेल्या काही वर्षांत जाणीवपूर्वक नियोजन केलं.पण त्यांचा मार्ग मात्र तितका सोपाही नाही.
तुम्हाला मोदी आवडो किंवा न आवडो… पण, त्यांच्याकडे दुर्लक्ष मात्र करता येत नाही. यावर्षी हे आणखी प्रकर्षानं जाणवलंय. सोशल मीडियावर सर्वात जास्त फॉलोअर्स त्यांचेच आहेत. यंदा अनेक जाहीर सभांमध्ये त्यांची उपस्थिती होती. इतकंच नाही तर सर्वाधिक वादातही तेच होते. बराक ओबामांसारखाच त्यांनीही एका रॅलीत ‘येस वुई कॅन’चा नारा देत आपणही देशाच्या सर्वोच्च पदाच्या शर्यतीत असल्याचे संकेत दिले होते. ते जिथे गेले तिथे त्यांनी विकासाचा राग आळवला.

‘मौत का सौदागर’, ‘हुकूमशहा’, ‘ध्रुवीकरण’ करणारा राजकारणी अशी विखारी टीकाही त्यांच्यावर झाली. पण, एकापाठोपाठ एक निवडणुका जिंकत त्यांनी सर्वाधिक मतं खेचणारा नेता आपणच असल्याचं सिद्ध केलं. पण, या दृश्यांनी अजूनही त्यांचा पिच्छा सोडलेला नाही.
2002च्या गुजरात दंगलींची काळी सावली ते जातील तिथे त्यांच्या मागे असते. पण, या मुद्द्यावर उत्तर देणं त्यांनी कायमच टाळलंय.  काही दिवसांपूर्वीच तुरुंगात असलेले माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी डी. जी. वंझारा यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे मोदी पुन्हा वादात अडकले. गुजरातमधल्या बनावट चकमकींमागे गुजरात सरकारचा हात असल्याचा गंभीर आरोप वंझारांनी केला. पण मोदींनी यावरही मौनच बाळगलं. इतकंच नाही तर दंगलींबाबतच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देण्याचं त्यांनी वेळोवेळी टाळलं.
सर्व आरोपांना उत्तर म्हणून त्यांनी नेहमी विकासाचा मुद्दा रेटला. इतिहासाच्या पानातून आणि लोकांच्या स्मरणातून गुजरात दंगलींचा अध्याय फक्त विकासाच्याच माध्यमातून मिटवला जाऊ शकतो, असा विश्वास त्यांना आहे. उद्योजकांच्या जवळचे म्हणूनही ते ओळखले जातात.
त्यांच्या याच प्रयत्नांचं यश म्हणून टाईम मॅगेझिनच्या कव्हर पेजवर ते झळकले. ब्रिटीश राजदूतांनी त्यांना आमंत्रण दिलं. पण,अमेरिकेची कवाडं मोदींसाठी अजूनही बंद आहेत. गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची चौथ्यांदा शपथ घेताना केलेल्या भाषणात त्यांनी त्यांच्या पुढच्या वाटचालीचे संकेत दिले होते. पण, आपल्या स्वभामुळे मोदींना स्वकियांची नाराजीही पत्करावी लागली. एनडीएचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या जेडीयूनं त्यांची साथ सोडली.

 

1990साली अडवाणींच्या रथ रात्रेचे ते सारथी होते. पण, आता परिस्थिती बदललीय.पंतप्रधानपदासाठी पक्षात अनेक योग्य उमेदवार असल्याचं अडवाणींना वाटतं. एकूणच सध्याची परिस्थिती आणि मतांचं राजकारण बघता मोदी भाजपची सर्वात मोठी ताकद ठरू शकतात किंवा मोदीच भाजपची कमकुवत बाजूही ठरू शकतात…येणारा काळच हे ठरवेल..

close