‘लोढा बिल्डर्स’कडून कायद्याचं उल्लंघन, काँग्रेस आमदारांचा आरोप

September 14, 2013 2:40 PM0 commentsViews: 1278

the world one14 सप्टेंबर : मुंबईतल्या वर्ल्ड वन, द पार्क आणि न्यू कफ परेड या लोढा बिल्डर्सच्या प्रोजेक्टमध्ये कायद्याचं उल्लंघन झाल्याचा आरोप काँग्रेसने केलाय. काँग्रेसचे आमदार भाई जगताप, अमीन पटेल, ऍनी शेखर आणि मधू चव्हाण या आमदारांनी भाजप आमदार आणि लोढा बिल्डर्सच्या मंगल प्रभात लोढा यांच्यावर हे आरोप केलेत.

 

या तीनही बांधकाम प्रकल्पांना तातडीनं स्टॉप वर्क नोटीस देण्यात यावी अशी लेखी मागणी काँग्रेसच्या या आमदारांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केलीये. पण लोढा बिल्डर्सच्या विरोधात आरोपांची ही मोहीम काँग्रेसच्या आमदारांनी दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार केलीये हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी केलेल्या ट्विटनंतर स्पष्ट झालंय.

 

प्रत्यक्षात मंगल प्रभात लोढा हे नरेंद्र मोदी यांचे पाठीराखे असून त्यांना आर्थिक रसद पुरवत असल्याचं काँग्रेसच्या वर्तुळात बोललं जातंय. तसंच मंगल प्रभात लोढा किंवा त्यांचा मुलगा अभिषेक लोढा यांना आगामी लोकसभा निवडणुकीत मिलिंद देवरा यांच्या विरोधात भाजप उभं करेल त्यासाठी दक्षिण मुंबई हा मतदार संघ शिवसेनेकडून भाजपला मिळावा हा प्रयत्न खुद्द मोदी करत आहे. त्यामुळेच लोढा बिल्डरचं हे प्रकरण नेमकं निवडणुकीच्या तोंडावर काढलं गेलंय असं बोललं जातंय.

काँग्रेसचे लोढांवर आरोप

  • - वर्ल्ड वनला IMD ची परवानगी नाही,
  • - 20 मजल्याच्यावर बांधकाम करता येत नाही
  • - द पार्कला गृहखात्याची परवानगी नाही
  • - न्यू कफ परेड प्रोजेक्टसाठी जमीनीवरचं आरक्षण उठवलं
  • - वर्ल्ड वन आणि द पार्क गिरणींच्या जमिनीवर
  • - पण गिरणी कामगारांना घरं नाहीत

 दिग्विजय सिंग यांनी ट्विटरवर काय प्रतिक्रिया दिलीय?
“महाराष्ट्रातले काँग्रेसचे आमदार अमीन पटेल आणि भाई जगताप यांनी भाजप आमदार लोढा यांच्यावर केलेल्या आरोपांची मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब चौकशी करावी”

close