जुन्नरमध्ये होणार दारुबंदीसाठी मतदान

January 31, 2009 2:20 PM0 commentsViews: 13

31 जानेवारी, जुन्नर रायचंद शिंदे ग्रामीण भागात दारूमुळे अनेक महिलांचे संसार उघडे पडलेत. गावामध्ये दारुबंदी असावी असं तिथल्या स्त्रियांना वाटतं. पण त्यासाठी पुढाकार घ्यायला मात्र अनेकजणी घाबरतात. या गोष्टीला छेद देत पुणे जिल्ह्यातील कडूस गावच्या महिला. कडूस गावातल्या महिला कंबरेला पदर खोचून गावामध्ये दारूबंदीसाठी प्रचार करत आहेत. तिथं उद्या रविवारी दारुबंदीसाठी मतदान होणार आहे. खेड तालुक्यातील 12000 लोकसंख्येच्या कडूस गावातली दारूची दुकानं बंद व्हावी म्हणून गावातील बचतगटातील महिलांनी एक ग्रामसभा बोलावली. दारूबंदीसाठी काय करावं लागेल यावर विचार विनिमय झाला.पुरूष मंडळीनीही यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचाही सहभाग होता. दारुबंदी झाली तर गावाची आर्थिक प्रगती झपाट्यानं होईल, असं माध्यमिक शाळेतले शिक्षक के. डी. ढमाले म्हणाले.ग्रामसभेत उपस्थित राहून महिलांनी मतदान करावं म्हणून या महिला वाड्या वस्त्यांवर जाऊन प्रचाराला लागल्या आहेत. शेतात काम करणार्‍या अशिक्षित महिला, वृध्द आजीबाईंनाही मतदानाला आग्रह केला. गावामध्ये मतदानाचे फ्लेक्स बोर्ड, दवंडी आणि घोषणा देऊन गाणी गाऊन दारुबंदीसाठी वातावरण तयार करण्यात आलं आहे. " जेव्हा आम्ही सगळ्याजणी बचत गटाच्या मिटींगसाठी जायचो तेव्हा आम्हाला गावातल्या दारुच्या दुकानाकडून जावं लागायचं. आम्ही शरमेनं मान खाली घालून जायचो. त्यावेळी आम्ही ठरवलं की गावात दारूबंदी करायची, " असं दारुबंदीसाठीच्या मतदानाच्या प्रचारक सुरेखा कुड सांगत होत्या. या मतदानाच्या प्रचारासाठी महिलांनी गाणी तयार केली आहेत. रविवारी. म्हणजे उद्या 1 फेब्रुवारीला कडूसच्या जिल्हा परिषद शाळेत सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यत दारूबंदीसाठी महिलांचं मतदान होणारेय. यासाठी गटविकास आणि राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक उपस्थित राहणारेत. 3235 महिला मतदारांपैकी 50 % म्हणजे 1618 महिलांचा यासाठी मतदान करावे लागणार आहे. मतदानातून दारूबंदी हा जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग असल्यानं महिलांनी जोरदार तयारी केलीयं.

close