‘MCA’ बनला राजकीय आखाडा !

September 17, 2013 8:46 PM0 commentsViews: 266

विनोद तळेकर, मुंबई.

 

17 सप्टेंबर : मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक 18 ऑक्टोबरला रंगणार आहे. पण ही निवडणूक गाजेल ती दिग्गज राजकीय नेत्यांच्या सहभागामुळे.. शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांनंतर आता गोपीनाथ मुंडेनीही एमसीएचं सदस्यत्व स्विकारलंय. त्यामुळे अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होण्याची जोरदार चर्चा मुंबई क्रिकेटच्या वर्तुळात रंगतेय.
मुंबई क्रिकेट असोसिएशनची यंदाची निवडणूक रंगतदार होणार यात काहीही शंका नाही. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शरद पवार उतरणार हे त्यांनी याअगोदरच स्पष्ट केलं होतं. त्यामुळे पवारांच्या विरोधात कोण उभं ठाकतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सोमवारीच माझगाव क्रिकेट क्लबकडून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी अर्ज भरला.आणि चर्चेला उधाण आलं.

पण आपण फक्त सदस्यत्व घेतलंय निवडणूक लढवण्याबाबत काहीही विचार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेमुळे चर्चा थंडावत असतानाच स्टायलो क्रिकेट कल्बकडून मुंडेंनी शेवटच्या दिवशी सदस्यत्त्वाचा अर्ज भरला आणि चर्चेची दिशाच बदलली.
एमसीएशी संलग्न असलेल्या 327 क्लबपैकी 40 ते 45 क्लब्सवर शिवसेनेचं वर्चस्व आहे. त्यातच पवारांच्या विरोधात मुंडे अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभे राहणार अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून मिळतेय. त्यामुळे पवारांना शह देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपली ताकद मुंडेंच्या पाठीशी उभी करावी असे प्रयत्न मुंडे गटानं सुरू केलेत. शिवाय विलासरावांचं गुडविल सुद्धा आपल्या मदतीला येईल असा विश्वास मुंडेंना वाटतोय. त्यामुळे यावेळी एमसीए निवडणुकीत राजकीय आखाडा रंगणार हे मात्र नक्की.

close