काँग्रेसही फोडणार प्रचाराचं नारळ !

September 19, 2013 8:19 PM0 commentsViews: 687

आशिष जाधव, मुंबई

19 सप्टेंबर : भाजपनं नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं, त्यामुळे कधी नव्हे ते काँग्रेसनंदेखील लोकसभा निवडणुकीला सहा महिने अवकाश असतानाच प्रचाराची तयारी सुरु केलीय. त्यादृष्टीने येत्या शनिवारपासून काँग्रेसच्या राज्यव्यापी वचनपूर्ती जनजागरण अभियानाला धडाक्यात सुरुवात होतेय.

 
साधारणत: पंधरा दिवसांपूर्वी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्र बसून राज्यातल्या प्रचाराची रणनीती आणि पक्षाच्या जाहिरनाम्याच्या मसुद्यावर चर्चा केली. प्रचारात आघाडी घेण्याचे निर्देशच दिल्लीतून राज्यातल्या नेत्यांना देण्यात आले. म्हणूनच मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी विरोधकांबरोबरच राष्ट्रवादीला इशारे द्यायला सुरुवात केलीय. आक्रमक प्रचार करुन संपूर्ण राज्य ढवळून काढण्यासाठी येत्या शनिवारी वाशिम जिल्ह्यातल्या कारंजामधून वचनपूर्ती जनजागृती अभियानाला सुरुवात होतेय.

 
जवळपास साडेपाच महिने चालणार्‍या या अभियानादरम्यान जिल्हानिहाय लहानमोठ्या चार हजार आठशे सत्त्याहत्तर सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. भाजपनं जरी नरेंद्र मोदींना पुढं करुन प्रचाराला सुरुवात केली असली तरीसुद्धा सरकारच्या योजना आणि निर्णय मतदारांना पटवून बाजी उलटवता येऊ शकते असं काँग्रेसला वाटतंय .

close