महिना उलटूनही दाभोलकरांचे मारेकरी मोकाटाच !

September 20, 2013 10:40 PM0 commentsViews: 266

अद्वैत मेहता, पुणे
20 सप्टेंबर : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला आज एक महिना पूर्ण झाला. पण 31 दिवस उलटूनही आरोपी मोकाट आहेत. एक महिना झाला तरी पोलीस कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहचू शकले नाहीत, असं असलं तरी तपास योग्य दिशेनं सुरु असल्याचा दावा पोलिसांनी केलाय.

 
दिनांक 20 ऑगस्ट…वेळ सकाळी सव्वासातची, फिरायला बाहेर पडलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर दोन अज्ञातानी गोळ्या झाडल्या. चार गोळ्या लागल्यानं दाभोलकरांचा जागीच मृत्यू झाला. पुरोगामी विचारांची चळवळ चालवणार्‍या एका नेत्याचा पुण्यासारख्या शहरात खून होणे, या घटनेनं महाराष्ट्रासह देशात खळबळ उडाली, गल्ली ते संसदेपर्यंत या हत्येचा निषेध झाला. घटनेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माहिती देणार्‍यास 10 लाखांचा इनाम जाहीर केला. गांधींची हत्या करणार्‍या प्रवृत्ती या खूनामागे
असल्याचं मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलंय. तर गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी या तपासाबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला. त्याचबरोबर या घटनेत कुणालाही क्लिन चिट दिली नसल्याचं पाटील यांनी सांगितलं.
आत्तापर्यंत पोलिसांनी 19 टीम स्थापन केल्या आहेत. दोन हजार सराईत गुन्हेगारांची तपासणी केलीय. 200 वाहनांची तपासणी करण्यात आली. दोन हल्लेखोरांची रेखाचित्रं तयार करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज काही उपयोगाचं नाही. असं असतानाही पोलीस मात्र तपास करु असं दावा करत आहेत.
दाभोलकरांना वैचारिक विरोध असणार्‍या संघटनांची चौकशी करण्यात आली. भोंदूबाबा, बोगस डॉक्टर, खडेवाले, तांत्रिक-मांत्रिक यांची चौकशी झालीय. पण खूनाच्या सूत्रधारापर्यंत पोलीस पोहचू शकले नाहीत. यामुळे एक महिना उलटूनही दाभोलकरांच्या हत्येचं गूढ कमी होण्याऐवजी अधिक गडद झालंय.

close