फिल्म रिव्ह्यु :’फटा पोस्टर निकाला हिरो’

September 20, 2013 10:52 PM0 commentsViews: 2438

अमोल परचुरे, समीक्षक
फटा पोस्टर निकला हिरो…महत्त्वाचं म्हणजे हा राजकुमार संतोषीचा सिनेमा आहे…घायल,घातक, दामिनी, अगदी अंदाज अपना अपना पर्यंत चांगले सिनेमे देणार्‍या संतोषीचे नंतरचे सिनेमे फार चालले नाहीत आणि मग अचानक ‘अजब प्रेम की गजब कहानी’ने प्रचंड कमाई केली. म्हणून मग त्याच स्टाईलची एक गजब कहानी पुन्हा पडद्यावर आलेली आहे. हिरोपासून व्हिलनपर्यंत सगळेच विनोदी, कथेमध्ये येणारे अचाट ट्विस्ट, कथेमध्ये ठराविक ठिकाणी उगाच आलेली गाणी असा सगळा अजब प्रेमसारखाच मामला ‘फटा पोस्टर निकाला हिरो’मध्ये सुद्धा आहे. या सिनेमात जेव्हा दोन मिनिटांसाठी खुद्द सलमान खान येतो तेव्हाच तुम्ही खळखळून हसता यावरुनच समजून जा की ही कॉमेडी कशाप्रकारची आहे ते…
काय आहे स्टोरी ?
ही गोष्ट आहे विश्वास रावची, ज्याला खरंतर हिरो व्हायचंय पण त्याच्या आईची इच्छा आहे मुलाने पोलीस बनावं… मग त्याचं पोलीस बनण्याचं नाटक, तोतया पोलीस असूनही मारधाड करुन गुन्हेगारांना पकडून देणं, हे नाटक करता करता व्हिलनच्या जाळ्यात सापडणं वगैरे असंख्य अतार्किक गोष्टी घडत राहतात. ‘मुन्नाभाई MBBS’ ते ‘डॉन’मधील स्टोरीचा आधार घेत हा विश्वास राव आणखी संकटात सापडत जातो.

phata poster nikla hiro (1)

आता तो हिरो असल्यामुळे अर्थातच शेवटी या सगळ्या संकटांतून त्याची मुक्तता होते अशी साधारण सिनेमाची गोष्ट आहे. इंटरव्हलपर्यंतच्या भागात जरा बरा असलेला सिनेमा इंटरव्हलनंतर पूर्ण ढेपाळूनच जातो. संजय शर्मा आणि सौरभ शुक्ला यांची कॉमेडीच सिनेमाला तारुन नेण्याचा प्रयत्न करत राहते.
नवीन काय?
‘जब वुई मेट’ सारख्या सिनेमाचा अपवाद सोडला तर सोलो हिरो असलेले शाहिद कपूरचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर फार कमाल करु शकलेले नाहीत. अर्थात, ‘ग्रँड मस्ती’ आणि ‘चेन्नई एक्स्प्रेस’चा अनुभव बघता आणि पुढच्या आठवड्यात मोठा हिंदी सिनेमा रिलीज होत नसल्यामुळे हा लॉजिक नसलेला सिनेमासुद्धा कदाचित चांगला बिझनेस करु शकेल. पण असं झालं नाही तर शाहिद कपूरचं बॅडलक सुरुच आहे असं म्हणायला लागेल.

phata poster nikla hiro (13)

बाकी सिनेमात पद्मिनी कोल्हापुरेला पुन्हा मोठ्या रोलमध्ये बघून बरं वाटतं. ग्लॅमरस आई साकारण्यापेक्षा तिने ग्रामीण आई साकारायचं चांगलं धाडस केलंय. बर्फी नंतर इलियना डिक्रुझचा हा दुसराच सिनेमा, पण दुसर्‍या सिनेमाची तिची निवड चुकली असंच म्हणावं लागेल. एकंदरित, हा सिनेमा बघून बाहेर पडल्यावर फार काही लक्षात राहत नाही यातच सगळं आलं.

रेटिंग : फटा पोस्टर निकला हिरो -40

close