‘लंचबॉक्स’ची लज्जत चाखाच…

September 20, 2013 11:10 PM1 commentViews: 1356

अमोल परचुरे, समीक्षक

‘लंचबॉक्स’ सारख्या आशयघन सिनेमा रिलीज करण्यासाठी करण जोहर आणि युटीव्हीने सपोर्ट करावा यातच भारतीय सिनेमाचा चेहरा कसा बदललाय ते लक्षात येतं. एखादा सिनेमा असा असतो की, तो बघितल्यावर त्यातले अनेक सीन्स आठवत राहतात. हा सीन आवडला का तो सीन जास्त आवडला यावर आपण विचार करत राहतो. अशा सिनेमाची समीक्षा करण्यापेक्षा कथा प्रवाही होती? दिग्दर्शन जास्त अव्वल होतं? की अभिनय उच्च दर्जाचा होता? असेच प्रश्न मनात घोळत राहतात. म्हणजे स्वादिष्ट जेवण झाल्यावर त्याची चव जशी बराच वेळ जीभेवर रेंगाळत राहते ना अगदी तसंच…रितेश बत्रा या लेखक दिग्दर्शकानं अगदी मनापासून केलेला हा सिनेमा आहे आणि म्हणूनच आपणही मनापासून तो एंजॉय करतो. अनेक अशा बारीक बारीक गोष्टी या सिनेमात आहेत ज्यांचा रुपक म्हणून वापर करताना आपलं रोजचं जगणं पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न रितेश बत्राने केलाय.

LUNCHBOX 3
सरकारी रुटीन लाईफ जगणार्‍या इरफान खानला रस्त्यावर एक चित्रकार दिसतो, रस्त्याच्या बाजूला बसून तो अनेक चित्रं काढत असतो. जवळ गेल्यावर इरफानला कळतं की, सगळी पेंटिंग्ज राजाबाई टॉवरचीच आहेत, पण आणखी जवळ गेल्यावर त्याच्या लक्षात येतं की, प्रत्येक चित्रात लोकांच्या हालचाली वेगवेगळ्या आहेत. रोज त्याच रस्त्यावरुन जाताना इरफानचे डोळेही याच हालचाली टिपत असतात. रुटीन आयुष्यातही त्याला ही चित्रं एकदम जवळची वाटतात आणि तो त्यातलं एक चित्र विकत घेतो. लंचबॉक्स सिनेमा बघून आपणही त्या सर्व वातावरणाशी असेच एकरुप होऊन जातो.
 काय आहे स्टोरी?

लंचबॉक्स मधली कॅरेक्टर्स खूप अस्सल आणि आपल्या रोजच्या जगण्यात कुठेही भेटतील अशी आहे. साजन फर्नांडिस हा सरकारी ऑफिसमध्ये नऊ ते पाच काम करणारा अगदी टिपिकल सरकारी कर्मचारी. तो फक्त कामापुरता लोकांशी बोलतो. त्याला कोणात मिसळायला आवडत नाही. लवकर रिटायर होऊन नाशिकला उरलेलं आयुष्य जगायचं हे त्याने ठरवलंय. त्याच्या अगदी विरुद्ध स्वभाव आहे अस्लम शेख म्हणजे नवाझुद्दीनचा… फर्नांडिस रिटायर झाल्यावर त्याचं काम अस्लम करणार आणि म्हणून उरलेल्या दिवसात
फर्नांडिस अस्लमला ट्रेनिंग देणार आहे.

LUNCHBOX

इला ही मध्यमवर्गीय गृहिणी…आयुष्याकडून फारशा अपेक्षा नसल्या तरी ती विचारी आहे, कुटुंबाला खुश ठेवण्यासाठी तिचे प्रयत्न सुरु असतात. या तीन महत्त्वाच्या कॅरेक्टर्समध्ये उलगडत जातो लंचबॉक्स…याशिवाय आपल्याला कधीही दिसत नसली तरी जिचा इलाबरोबरचा संवाद कळत राहतो अशी इलाची एक शेजारी, डबेवाले, फर्नांडिसचे बॉस, अस्लमची बायको हे इतर घटकसुद्धा लंचबॉक्सच्या रेसिपीमध्ये आहेत. मुख्य म्हणजे, मुंबई शहर, लोकल ट्रेन आणि अगदी डबेवाल्यांच्या सायकलीला लटकलेले डबे या गोष्टीसुद्धा अगदी जिवंत वाटाव्यात अशा दिसत राहतात. कथा एवढी प्रवाही आहे की खूप नाट्यमय वळणं वगैरे नसतानासुद्धा पुढे काय होणार याची उत्सुकता शेवटपर्यंत टिकून राहते आणि शेवट प्रेक्षकांवरच सोडून दिग्दर्शक मोकळा झालेला आहे.

परफॉर्मन्स

आयुष्याला तसा कंटाळलेला साजन फर्नांडिस हे कॅरेक्टर इरफान खानने अगदी सहज साकारलंय. म्हणजे आपण उगाच ऍक्टींग वगैरे करतोय असा कोणताही आविर्भाव नाही, अगदी तीच गोष्ट नवाझुद्दीनची… बडबड्या, सतत मागे लागणारा, इनसिक्युअर पण तरी मनानं एकदम सच्चा असा अस्लम रंगवताना नवाझुद्दीनने खरंच कमाल केलीये. ही अशीच कमालीची सहजता भारती आचरेकर यांच्या आवाजात आणि बोलण्यात आहे.

lunchbox3

संपूर्ण सिनेमाभर त्या दिसत नसतानाही त्यांनी केवळ संवादांनी जी मजा आणलीये ती खरंच लाजवाबच आहे. निम्रत कौरच्या अभिनयातही खूप खरेपणा आहे, आणि पहिल्याच सिनेमात तिने सॉलीड परफॉर्मन्स दिल्यामुळे तिचा अभिनय आगामी अनेक सिनेमात बघायला मिळेल हे नक्की…रंगभूमीची ताकद काय आहे हे सर्वच कलाकारांनी लंचबॉक्समध्ये दाखवून दिलंय. डबेवाल्यांना घेऊन स्टेारीमध्ये थोडा ट्विस्ट आणून एवढा सहजसुंदर आणि सगळ्याच बाबातीत जुळून आलेला सिनेमा बनवल्याबद्दल रितेश बत्राचं अभिनंदन करायला हवं आणि धन्यवादही द्यायला हवेत.

रेटिंग : द लंचबॉक्स -85

  • Akash Deshpande

    Utsuk ahe mi ha cinema pahayala!

close