राज्यातल्या 6 जिल्ह्यांना फ्लोरोसिसचा विळखा

September 23, 2013 2:56 PM1 commentViews: 1375

florosisअलका धुपकर, नांदेड
23 सप्टेंबर : महाराष्ट्रात सिंचन घोटाळ्याचा फटका बसला तो ठिकठिकाणच्या धरणांना…पाणी मिळवण्यासाठी अमर्यादित प्रमाणात बोअरवेल खोदल्या गेल्या आणि खोलवर खोदलेल्या या बोअरवेलना फ्लोराईडयुक्त पाणी लागलं. बराच काळ हे पाणी प्यायल्यानं राज्यात 6 जिल्ह्यांना  फ्लोरोसीस रोगाचा विळखा पडलाय.

 
भारतातल्या 19 राज्यांतील 196 जिल्हे फ्लोरोसिसग्रस्त आहेत. यापैकी महाराष्ट्रात सर्वात बाधित जिल्हे आहेत. नांदेड, चंद्रपूर, वाशिम, यवतमाळ, लातूर आणि बीड महाराष्ट्रातले 6 जिल्हे. एकट्या नांदेडमधल्याच 303 गावातल्या पाण्याचे नमुने फ्लोराईडचं पाण्यातलं प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक असल्याचा इशारा देतात.

 
भोकर तालुक्यातल्या एकाच गावात अस्थी म्हणजेच स्केलेटल फ्लोरोसिसचे अनेक पेशंट्स आहेत.फ्लोराईडयुक्त पाणी अनेक वर्ष प्याल्यानं गावकर्‍यांची हाडं ठिसूळ झालीय. इतकी की हळूहळू हाडं वाकडी झाली असून पाय दुमडत नाहीत. अंगदुखीन हैराण झालेल्यांना कोणत्याही औषधाने इलाज होत नाही. गुडघे सुजलेले आणि पाय वाकडे झालेले.

 
एक आजोबा तर, गेली पाच वर्ष अंथरुण धरुन आहेत. त्यांचा कणा ताठ होत नाही, त्यामुळे त्यांना झोप देखील बसूनच काढावी लागते. अस्थी फ्लोरोसिसने त्यांची हाडं खिळखिळी झालीयत. माहूर तालुक्यातल्या सावरखेडमध्ये तर पाठीच्या कण्याला उभाच्या उभा बाक आलेले अस्थी फ्लोरोसिसचे पेशंट्स भेटतात. वार्धक्यामुळे कंबर वाकली असेल, अशी शंका मनात येऊ शकते पण, अस्थी फ्लोरोसिसच्या पेशंट्सचं थोडं निरीक्षण केल्यावर हा बाक वेगळा आहे, हे लक्षात येतं. सरकारी डॉक्टरांनी देखील याची तपासणी केलीय. पण हे रुग्ण आता कधीच बरे होऊ शकणार नाहीत.

 
फक्त हाडचं नाही तर, दात देखील फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे ठिसूळ बनतात आणि अगदी निकामीही..सावरखेडसारख्या गावांमध्ये फ्लोरोसिसमुळे दाताची बोळकी झालेले मध्यमवयीन नागरिक आहेत, ज्यांना कवळी बसवण्याचा खर्चही परवडू शकत नाही. फ्लोराईडयुक्त पाणी पिण्याऐवजी, या गावातल्या पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत बदलला तरच महाराष्ट्रातली पुढची पिढी फ्लोरोसिसमुक्त आयुष्य जगू शकेल.

  • murari

    He deva sarkarala velicha changali buddhi de nahitar 2014 ahech

close