…नाहीतर महायुती तोडावी लागेल -आठवले

September 23, 2013 10:41 PM1 commentViews: 1640

विनोद तळेकर,मुंबई
23 सप्टेंबर : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत पण असं असताना महायुतीत मात्र आलबेल नाही. आरपीआयने जागावाटपाबाबत निर्णय घ्या नाहीतर युतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिलाय. हा इशारा म्हणजे शिवसेना भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे की आठवलेंना काही वेगळं हवंय.
शिवशक्ती-भीमशक्ती एकीकरणानंतर आठवलेंना भरलेलं ताट देऊ असं आश्वासन शिवसेनेने दिलं होतं. पण आता महायुती अस्तित्वात आल्यानंतर महापालिकेत एक नगरसेवक वगळता आरपीआयच्या वाट्याला फारसं काही आलं नाही. वारंवार विनंत्या करूनही जागावाटपाच्या चर्चेसाठी सेना भाजप काही प्रतिसाद देत नाही हे लक्षात आल्यावर आठवलेंचा संयम सुटला.
फक्त लोकसभेचं जागावाटप हेच आठवलेंचं दुखणं नाही, तर राज्यसभेची खासदारकी मिळत नाही ही देखील आठवलेंची सल आहे.महापालिका निवडणुकीत सत्तेवर येण्यासाठी आमची वोटबँक कामी आली आणि आता लोकसभा आणि विधानसभेतही हीच वोटबँक सत्ता संपादनासाठी कामी येणार असा आठवलेंचा दावा आहे. आणि त्याचा मोबदला म्हणून आठवलेंचा खासदारकी देऊन सन्मान करावा असं आरपीआयचं म्हणणं आहे.
आठवलेंच्या इशार्‍यानंतरही शिवसेना आणि भाजपने त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीए. जर का आठवलेंचा हा दबावाचा वारही कामी आला नाही आणि खरंच महायुतीतून बाहेर पडण्याची वेळ आरपीआयवर आली तर मात्र आरपीआयची अधिक अडचण होईल. त्यामुळे आगामी काळात आरपीआयला अधिक मुत्सद्दीपणाने पावलं टाकावी लागतील हे नक्की..

  • ARVIND PUJARI

    swatahachya balavar nivadnuk ladha

close