काश्मिरी मंत्र्यांना लष्कराचा पैसा दिला-सिंग

September 24, 2013 4:05 PM0 commentsViews: 478

vk singh24 सप्टेंबर : माजी लष्करप्रमुख जनरल व्ही के सिंह यांनी आणखी एक वाद निर्माण केलाय. लष्कराच्या निधीचा पैसा जम्मू-काश्मीरच्या मंत्र्यांना दिल्याचं व्ही.के. सिंग यांनी आयबीएन-नेटवर्कचे एडिटर इन चीफ राजदीप सरदेसाई यांच्याशी बोलताना कबूल केलंय. व्ही के सिंग यांच्या या खळबळजनक वक्तव्यानंतर वादळ निर्माण झालंय.

 

आपल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली असल्याचं लक्षात आल्यावर सिंग यांनी सारवासारव केली. हा पैसा सामाजिक कामांसाठी दिल्याचा दावा आता सिंग यांनी केलाय. जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा वेगळा आहे. राज्यात अनेक तरूण कार्यकर्ते काम करत आहे. राज्यात शांतता कायम राहावी यासाठी हा पैसा दिला गेला असं सिंग यांनी सांगितलं.

 

तर सिंग यांनी कोणत्या मंत्र्यांना पैसे दिले हे स्पष्ट करावं अशा मंत्र्यांवर कारवाई केली जाईल असं केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केलं. तसंच जम्मू काश्मीर सरकारनं केंद्र सरकारला पत्र लिहिलंय. आणि व्ही के सिंगनी केलेल्या आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणी केलीय.

 

दरम्यान, याविषयी विचारले असता, केंद्रीय गृहराज्यमंत्री आरपीएन सिंह यांनी स्पष्ट काही बोलायला नकार दिला. हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे, त्यावर टीव्हीवर चर्चा करता येणार नाही, असे ते म्हणाले. मात्र, लष्करात सर्वोच्च पदावर काम करणार्‍यांनी असे वक्तव्य करू नये अशी अपेक्षा गृहराज्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

close