शनिवारवाडा दिसणार मुळ स्वरुपात?

September 24, 2013 6:31 PM0 commentsViews: 1157

24 सप्टेंबर : पेशवाईच्या काळातल्या सात मजली शनिवारवाड्याबद्दल आपण ऐकलंय. पण आता मात्र हा जुन्या काळातला शनिवारवाडा पुन्हा एकदा पाहण्याची संधी पुणेकरांना मिळण्याची शक्यता आहे. मराठी साम्राज्याची पेशवाईची आठवण करुन देणारा हा शनिवारवाडा मुळ स्वरुपात उभारला जावा असा प्रस्ताव पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने मंजूर केलाय. त्याचा आराखडा तयार करण्यासाठी आता सल्लागार म्हणून कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे यांनी दिली. नगरसेवक हेमंत रासने यांनी हा प्रस्ताव मांडला होता. त्याला आज स्थायी समितीमध्ये मंजुरी देण्यात आली. मात्र स्थायी समितीची मंजुरी मिळाली असली तरी अजूनही योजना प्रत्यक्षात यायला बराच कालावधी जाऊ शकतो. हा प्रस्ताव पुरातत्व खात्याच्या परवानगी साठी पाठवला जाणार आहे. आणि त्याबरोबरच राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. त्यांच्या मंजुरीनंतरच या ठिकाणी काम सुरु करता येऊ शकेल. शनिवारवाड्याची मुळ वास्तु ज्या प्रमाणे होती तशीच वास्तु उभारली जावी असा महापालिकेचा प्रयत्न असल्याचं रासनेंनी सांगितलं.

close