नाशिक विकास आराखडा रद्द,चौकशी कधी?

September 24, 2013 10:14 PM0 commentsViews: 209

दीप्ती राऊत, नाशिक
24 सप्टेंबर: नाशिक महापालिकेचा विकास आराखडा शेतकरी विरोधी आणि बिल्डरधार्जिना असल्याबद्दल फेटाळण्यात आला. महापालिका आयुक्तांच्या नेतृत्वाखाली नवीन आराखडा तयार करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय. पण बिल्डर्सच्या जमिनींना संरक्षण देणारे अधिकारी कोण आणि त्यांची चौकशी करणार कोण याबाबत मात्र सगळेचजण मूग गिळून गप्प आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून नाशिक शहराचा विकास आराखडा तयार करण्यात येत होता. पण प्रत्यक्षात तो आराखडा म्हणजे नाशिकचा नाही तर बिल्डरांचा विकास आणि मूळ जमीनमालक भकास असा असल्याचं सिद्ध झालं. बिल्डरांनी खरेदी केलेल्या जमिनी त्यात वाचवण्यात आल्या आणि इतर जमिनींवर आरक्षणं टाकण्यात आली.

 
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन किमान सर्व पक्षीय रेट्यामुळे तो विकास आराखडा फेटाळण्यात आला. पण विषय इथंच संपला नाही. बिल्डरांच्या जमिनी वाचवणारे अधिकारी कोण, त्यांनी कोणते नियम डावलले, त्यासाठी महापालिकेपासून शासनाच्या नगर विकास खात्यातल्या कोणत्या झारीतल्या शुक्राचार्‍यांनी त्यांना मदत केली, त्यांची चौकशी कोण करणार आणि त्यांच्यावर काय कारवाई होणार हे खरे प्रश्न आहेत. पण ते गुलदस्त्यातच ठेवण्यात आले.

 
विकास आराखडा तयार केला नगर रचना विभागाच्या सहाय्यक संचालकांनी. तो विभाग महापालिकेचा. पण त्यासाठी अधिकारी नेमले होते शासनाच्या नगरविकास खात्याचे. त्यामुळे आता अर्थातच त्याच्या जबाबदारीचा चेंडू दोघेही एकमेकांकडे ढकलत आहेत. चौकशी करण्याच्या घोषणा तर सगळ्यांनीच केल्यात. पण प्रत्यक्ष चौकशी कोण करणार याबाबत मात्र सगळ्यांनीच मूग गिळलेत. कारण त्यातच झारीतल्या शुक्राचार्यांची नावं उघड होऊ शकतात.

close