जायकवाडीच्या पाण्यावरून नेत्यांमध्येच पेटला संघर्ष

September 24, 2013 10:30 PM0 commentsViews: 424

सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद
24 सप्टेंबर : जायकवाडीच्या पाण्यावरून प्रांतियवाद सुरू होण्याची चिन्ह होती. पण त्याआधीच मराठवाड्यातील राजकीय नेत्यांचा आपापसातील वाद पेटलाय. शिवसेना, काँग्रेस आणि जायकवाडी पाणी संघर्ष समिती यांच्या ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे आंदोलन विभागलं गेलं. मराठवाड्याला पुढील काळात पाण्याची नितांत गरज असताना राजकीय नेते मात्र राजकीय पोळी भाजण्याच्या प्रयत्नात आहेत.

जायकवाडी पाणी संघर्ष कृती समिती मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहे. समितीच्या वतीने सर्वांना सोबत घेऊन लढा लढवण्याचा अनेकदा प्रयत्न झाला. पण मराठवाड्याच्या राजकीय नेतृत्वानं राजकीय श्रेयासाठी एकत्रित लढ्यात उडी घेतलीच नाही. त्यामुळे मराठवाड्याचा पाण्यासाठीचा टाहो सरकार दरबारी पोहचलाच नाही. काँग्रेस आणि शिवसेना राजकीय फायद्या तोट्याची गणित मांडत सावधपणे आंदोलन करतीये.
काँग्रेसनंही पाण्यासाठी आंदोलनाची वेगळी चूल मांडली. काँग्रेसचे आमदार कल्याण काळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याच्या मुहूर्तावर एक दिवस आधी उपोषणाचं नाट्य केलं आणि मुख्यमंत्र्यांनीही अनेक वर्षापासून लढा देणार्‍या नागरीकांच्या महामोर्चाला बगल देत आपल्या आमदाराच्या उपोषण स्थळी जावून उपोषण नाट्य संपवलं. मात्र ठोस काहीच सांगितलं नाही. कारण मुख्यमंत्र्यांनाही जायकवाडीच्या पाण्याचा निर्णय निवडणुकीच्या तोंडावर देऊन राष्ट्रवादीवर कुरघोडी करायची आहे
जायकवाडी धरणात केवळ 22 टक्के पाणी साठी मात्र जायकवाडी धरणाच्या वरच्या धरणांमध्ये

  • दारणा–91 टक्के
  • गंगापूर धरण–92 टक्के
  • भावली –100 टक्के
  • वाघाड 100 टक्के
  • भंडारदरा–100 टक्के
  • निळवंडे धरण–57 टक्के

जायकवाडीच्या वरची धरणं जवळपास भरली असतांना समन्यायी पाणी वाटपाची अंमबजावणी होत नाहीये. नगर नाशिकमध्ये पाणी अडवण्यासाठी राजकीय एकजूट आहे. मात्र मराठवाड्यात राजकीय एकजुटीचा अभाव आहे. मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी राजकीय नेते फायद्या नुकसानीचे गणित मांडत असले तरी जनतेची मात्र एकजूट होण्याची गरज आहे.

close