कथाकार हरपला

September 25, 2013 9:36 PM0 commentsViews: 134

21 सप्टेंबर : आपल्यापैकी अनेकांची ‘सकाळ शहाणी’ करणारे ज्येष्ठ लेखक शन्ना नवरे यांचं आज निधन झालं. कथा,कादंबर्‍या,पटकथा, नाटकं, ललित, अनुवाद साहित्याच्या सगळ्या प्रांतांमध्ये मुशाफिरी करणार्‍या आणि आपल्या साध्या सरळ लिखाणातून वाचकांच्या मनात कायमचं स्थान मिळवणार्‍या शन्नांना IBN लोकमतची आदरांजली

 
शंकर नारायण नवरे अर्थात वाचकांचे लाडके शन्ना…ताजं, टवटवीत लिखाण हे शन्नांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य. यांच्या लेखनातली पात्रं आपल्याला हसवायची, विचार करायला लावायची आणि अंतर्मुखही करायची.

 
21 नोव्हेंबर 1927 रोजी जन्मलेल्या शन्नांचं शिक्षण डोंबिवली आणि दादरच्या किंग जॉर्ज शाळेत झालं. त्यांनी 1949 मध्ये बी.एस्सी ची पदवी घेतली. वृत्तपत्र आणि मासिकांमधून त्यांच्या कथा, ललित लेख प्रसिद्ध झाले. साध्या सरळ माणसाचं आयुष्य शन्नांनी तितक्याच साध्या सरळ भाषेतून आपल्या समोर आणलं. वाचकांना भावलेली.

 
शहाणी सकाळ, असो किंवा तिळा उघड, पर्वणी,दिवसेंदिवस, पैठणी,जत्रा,तिन्हीसांजा, ऊनसावल्या या असे अनेक कथासंग्रह. शन्नांचं लिखाण कधी हसू उमटवणारं तर कधी नकळत डोळ्यांमध्ये पाणी आणणारं..आनंदाचं झाड ही त्यांची कादंबरी किंवा गुंतता ह्रदय हे, गहिरे रंग ही नाटकं असो.शन्ना त्यांच्या वाचकांसाठीच लिहीत गेले.

 
समोरच्याशी पटकन मैत्री करणं,मनात काहीही न ठेवता दिलखुलास बोलणं ही शन्नांची वैशिष्ट्य. त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला त्यांच्या चैतन्याचा स्पर्श होई. मोठंमोठं तत्वज्ञान सांगण्यापेक्षा छोट्या गोष्टींमधून वाचकांना आयुष्याकडे पाहण्याचा नवीन दृष्टीकोन शन्नांनी दिला. त्यामुळेच तर त्यांचं लिखाण नेहमीच आनंदाचं झाड ठरलं.

close