कृष्णा खोरे घोटाळ्यात विरोधकही हिटलिस्टवर?

September 25, 2013 10:40 PM0 commentsViews: 773

आशिष जाधव,मुंबई
25 सप्टेंबर : कृष्णा खोरे घोटाळ्याच्या चौकशी अहवालावरून नवीन राजकारण पेटण्याची चिन्हं दिसत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांपाठोपाठ सेना-भाजपच्या नेत्यांना देखील सिंचन घोटाळ्यात अडकवण्याची मुख्यमंत्र्यांची योजना असल्याची जोरदार चर्चा आहे.

 

दोन वर्षांपूर्वी विधिमंडळाच्या चर्चासत्रात श्वेतपत्रिकेच्या मागणीवरून सिंचन दुरवस्थेला चर्चेला तोंड फुटलं. आणि बघता बघता सिंचन घोटाळ्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांची कोंडी झाली. त्यातच जलअभियंता विजय पांढरे यांच्या पत्रात उपसा सिंचन योजनेतील भ्रष्टाचारावरून सेना-भाजपच्या युती सरकारवरही दोषारोपण झालं. आणि इथंच चाणाक्ष मुख्यमंत्र्यांनी कृष्णा खोर्‍यातल्या भ्रष्टाचाराच्या चौकशी अहवालाचं महत्व ओळखलं. त्यामुळंच कदाचित आज ऍण्टी करप्शन ब्युरोचा तो चौकशी अहवाल गहाळ झाल्याचं राज्य माहिती आयोगानं जाहीर केलंय असं मानलं जातंय.

 
ऍण्टी करप्शन ब्युरोचे पोलीस अधिकारी एस.एम.मुश्रीफ यांच्या या अहवालात तत्कालीन सेना-भाजप सरकारनं ठेकेदार अविनाश भोसले आणि वेंकू रेड्डी यांच्याबरोबर संगनमत करून कृष्णा खोर्‍याचं कसं मातेरं केलं याचा लेखाजोखा मांडलाय.

 
या प्रकरणावरून सेना भाजप युती सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी,उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, पाटबंधारे मंत्री एकनाथ खडसे यांच्या बरोबरच बिल्डर अविनाश भोसले यांच्यावरही चौकशीचा ससेमिरा चालवण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी एस एम मुश्रीफांच्या अहवालावरची धूळ झटकण्याची घोषणा केली अशी चर्चा आहे.  आधीच राष्ट्रवादीचे नेते सिंचन घोटाळ्यात अडकले आहेत. त्यात आता सेना-भाजपचे नेते देखील गोवले गेले तर त्याचा सर्वाधिक फायदा काँग्रेसला होईल हे स्पष्ट दिसतंय.

close