जम्मूमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात12 जणांचा मृत्यू

September 26, 2013 1:21 PM0 commentsViews: 692

jammu_attacks jammu and kashmir terrorist attack26 सप्टेंबर : भारत-पाकिस्तान चर्चेला काही तास राहिले असताना आज सकाळी जम्मूत तीन अतिरेक्यांनी हैदोस घातला. या हल्ल्यांमध्ये एका वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यासह 12 जणांना जीव गमवावे लागलेत. त्यात 5 पोलीस आणि 3 लष्करी जवानांचा समावेश आहे.

 

हल्ला करणार्‍या तिन्ही अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात यश आलंय. जम्मूतल्या कथुआ मधल्या पोलीस ठाण्यावर आणि सांबा सेक्टरमधल्या लष्कराच्या कॅम्पवर या अतिरेक्यांनी हल्ला चढवला होता. अतिरेक्यांनी दोन्ही ठिकाणी बेछूट गोळीबार केला. त्याला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलं. तब्बल 9 तास ही चकमक सुरू होती. सीमेपलिकडून हा हल्ला झाल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांनीही सांगितलंय.

 

पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची 3 दिवसांनंतर न्यूयॉर्कमध्ये बैठक होणार आहे ती रद्द करावी अशी मागणी आता भाजपने केलीये. पण ही चर्चा ठरल्याप्रमाणेच होईल, असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलंय.

 

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानसोबत चर्चा सुरूच राहील, असं स्पष्ट केलंय. शांततेच्या शत्रंूनी चर्चेच्या प्रक्रियेला पुन्हा एकदा खीळ घालण्याचा प्रयत्न केला असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

 

पंतप्रधान आपल्या निवेदनात म्हणतात, सीमेपलीकडून प्रोत्साहन मिळत असलेल्या दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. असे हल्ले,चर्चेद्वारे प्रश्न सोडवण्याच्या सरकारच्या निर्धाराला परावृत्त करु शकत नाही..

ऑपरेशन नेमकं कसं पार पडलं ?

वेळ पहाटे साडे 4 वाजता…
3 अतिरेकी नियंत्रण रेषा ओलांडून हरिया चक गावात पोचले. पण, त्यांनी जवानांचा गणवेश घातल्यानं ते भारतीय सैन्य दलाचे जवान असावेत, असा गावकर्‍यांचा समज झाला.

यानंतर पहाटे सव्वा पाच वाजता
सकाळी भाजी घेऊन जाणार्‍या एका ऑटोला या अतिरेक्यांनी अडवलं आणि ऑटो ड्रायव्हरला ऑटो सांबा भागाकडे न्यायला सांगितली.
सकाळी सहा वाजता ते हायवेवर पोचले. तिथे त्यांना कथुआ पोलीस स्टेशन दिसलं. थोडा वेळ तिथेच टेहळणी केल्यावर त्यांनी साडे सहाच्या सुमाराला गेटवर पहारा देत असलेल्या शिपायाच्या दिशेने ग्रेनेड भिरकावला आणि गोळीबारही केला. अशाप्रकारे त्याला ठार करून हे अतिरेकी पोलीस ठाण्याच्या परिसरात घुसले आणि बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात 3 पोलीस, 1 नागरिक आणि एक एएसआय ठार झाले.
एव्हाना सकाळचे सात वाजले होते. कथुआ पोलीस ठाण्यात असा नरसंहार करून हे अतिरेकी बाहेर पडले. बाहेरच असलेल्या ट्रकला त्यांनी अडवलं. पण, क्लीनरनं त्यांना घेऊन जायला नकार दिला. तेव्हा त्यालाही गोळी झाडून ठार करण्यात आलं. या सर्व प्रकारानं घाबरलेल्या ड्रायव्हरनं ते म्हणतील त्या दिशेनं ट्रक पळवला.
सकाळी 8 वाजता हा ट्रक सांबा जिल्ह्यात पोचला. आर्मी कॅम्प जवळ येताच या अतिरेक्यांनी ड्रायव्हरला चालत्या ट्रकमधून बाहेर फेकलं.
आता हे अतिरेकी जंगलाच्या बाजूने असलेल्या गेटमधून ब्रिगेड हेडक्वार्टरच्या 16 कॅव्हेलरी यूनिटमध्ये दाखल झाले. या गेटवर पहारा देत असलेल्या शिपायालाही त्यांनी ठार केलं.
त्यानंतर या अतिरेक्यांनी अधिकार्‍यांच्या खाणावळीत घुसून लेफ्टनंट कर्नल ब्रिकमजीत सिंग यांना ठार करण्याचा प्रयत्न केला. यानंतर ते धावत कमांडिंग ऑफिसरच्या रुममध्ये पोचले आणि तिथून बेछूट गोळीबार केला. यात लेफ्टनंट कर्नलसह लष्काराचे 3 जवान शहीद झाले तर कमांडिंग ऑफिसरसह तिघं जखमी झाले. यानंतर शीघ्र कृती दलाला तात्काळ बोलवण्यात आलं आणि त्यांनी 3 अतिरेक्यांना कंठस्नान घातलं.

 

काश्मीरमध्ये झालेल्या या अतिरेकी हल्ल्यावरून काही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

  • - दहशतीच्या या वातावरणात पाकिस्तानबरोबर चर्चा करू नये, ही भाजपची मागणी योग्य आहे का?
  • - पाकिस्तानातले अराजक तत्त्व शांतता प्रक्रियेला पुन्हा एकदा खीळ बसवू पहात आहेत का?
  • - पाकिस्तानबरोबर चर्चा करण्यावरून काँग्रेसमध्येच मतभेद आहेत का?
  • - भारत-पाकिस्तान चर्चेपूर्वी हल्ले घडवण्याची अतिरेक्यांची रणनीती आहे का?
  • - शांतता स्थापनेसाठी नवाझ शरीफ यांनी दिलेल्या आश्वासनांची ते पूर्तता करू शकतील का?
  • - अतिरेकी हल्ल्यांचा सामना करण्यासाठी सैन्य तळ आणि पोलीस ठाणे सज्ज का नव्हते?
  • - पाकिस्तानबरोबरच्या चर्चेला पंतप्रधानांनी व्यक्तिगत प्रतिष्ठेचा विषय केला आहे का?
  • - कडेकोट सुरक्षा असलेल्या सीमेवरून अतिरेक्यांनी भारतात प्रवेश कसा केला?

 

 

close