‘आदर्श’मध्ये भाजप आमदार लोढांचा बेनामी फ्लॅट?

September 26, 2013 8:28 PM0 commentsViews: 740

mangal prabhat lodhaआशिष जाधव, मुंबई
26 सप्टेंबर : वादग्रस्त आदर्श सोसायटीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबरच भाजच्या नेत्यांशी संबंधित बेनामी फ्लॅट्स असल्याचं आढळून आलंय. आयबीएन-लोकमतच्या हाती लागलेल्या कागदपत्रांनुसार भाजपचे मुंबईतले आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याशी संबंधित लोकांचे आदर्शमध्ये बेनामी फ्लॅट असल्याचं उघडकीस आलंय.

दक्षिण मुंबईतल्या या आदर्श सोसायटीचे इमलेच मुळी भ्रष्टाचाराच्या पायावर रचले गेलेत. सीबीआय, आर्थिक गुन्हे शाखा आणि न्यायालयीन आयोगाच्या चौकशीत आदर्शमधलं सारं काळंबेरं बाहेर आलंय. त्यानुसार आदर्शमधील जवळपास 30 फ्लॅट्स काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे बेनामी मालमत्ता आहेत. पण आता आयबीएन लोकमतच्या हाती लागलेल्या महत्त्वपूर्ण कागदपत्रांमुळे आदर्शमधल्या भाजप कनेक्शनचा पर्दाफाश होतोय.

 
भाजपचे दक्षिण मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ गमरे यांच्या नावावर आदर्शमध्ये फ्लॅट देण्यात आलाय. या फ्लॅटसाठी सिद्धार्थ गमरे यांना लोढा बिल्डर्सच्या बँक अकाऊंटमधून 65 लाख 5 हजार 768 रूपयांचे चेक्स देण्यात आले. विशेष म्हणजे आदर्श सोसायटीला पर्यावरणाची वादग्रस्त मंजुरी देणारे नगरविकास खात्याचे तत्कालीन उपसचिव आणि आदर्श प्रकरणातले आरोपी पी. व्ही. देशमुख हे निवृत्तीनंतर लोढा बिल्डर्सचे कन्सल्टंट बनले. त्यांच्याच सांगण्यावरून आपण आदर्शमध्ये फ्लॅट घेतला आणि त्यासाठी लोढा बिल्डर्सनीच पैसे दिले, अशी साक्ष सिद्धार्थ गमरे यांनी न्यायालयीन आयोगासमोर दिलीय.

 
पण लोढा बिल्डर्सकडे आपण दलाल म्हणून काम करत होतो. त्यामुळे बँक अकाऊंट्समधून आपल्या आदर्शच्या फ्लॅटसाठी सर्व पैसे वळते झाले, असं सिद्धार्थ गमरे यांनी आयबीएन लोकमतला सांगितलंय. त्यामुळे बेनामी कायद्यानुसार सिद्धार्थ गमरे यांचा आदर्शमधला फ्लॅट हा भाजपचे मलबार हिलचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या कुटुंबीयांचा बेनामी फ्लॅट असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केलाय. मंगलप्रभात लोढा यांच्याशी आम्ही संपर्क साधला, तेव्हा आदर्शचा अहवाल सरकारकडे आहे. त्यातून काय ते स्पष्ट होईल, एवढीच प्रतिक्रिया त्यांनी दिली. सर्व काही माहित असूनही भाजपचे नेते मात्र वेगळाच सूर लावतायत. लोढा हे दक्षिण मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढवू इच्छितात तर गमरे आता भाजपचे स्थानिक अध्यक्ष आहेत. त्यामुळे आता हा नवा खुलासा भाजपसाठी अडचणीचा ठरणार, हे निश्चित.

close