‘मनरेगा’त कोट्यावधीचा घोटाळा, पत्रकार-छायाचित्रकारांना केलं मजूर !

September 26, 2013 9:22 PM1 commentViews: 1058

साहेबराव कोकणे, अहमदनगर
26 सप्टेंबर : अहमदनगरमधल्या पाथर्डीमध्ये मनरेगाच्या कामात 1 कोटी 10 लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालंय. या कामांमध्ये लाभार्थी म्हणून नगरसेविकेसह पत्रकार, प्रेस फोटोग्राफर, खाजगी आणि सहकारी संस्थांचे कर्मचारी या सार्‍यांचा मजूर म्हणून सहभाग असल्याचा अजब प्रकार उघड झाला आहे.

 
पाथर्डी तालुक्यातल्या बहुतेक खेड्यांमधल्या रस्त्यांची दुर्दशा झालीय. मनरेगाअंतर्गत आणि रोहयोच्या कामातून या रस्त्यांच्या बांधणीसाठी तब्बल 1 कोटी 10 लाख रुपये खर्च झालेत. एवढंच नाही तर विजय डहाळे यांच्या वडिलांचा मृत्यूही याच खराब रस्त्यांमुळे झालाय. कारण त्यांना वेळेत दवाखान्यात नेता आलं नव्हतं.

 

रस्त्यांची कामं मजुरांकडून करुन न घेता जेसीबीसारख्या अद्ययावत यंत्रानं करण्यात आलीत. पण तीही अर्धवट आणि अजब प्रकार म्हणजे राष्ट्रवादीच्या पाथर्डीच्या नगरसेविका सुरेखा गोरे त्यांचे पती आणि ठेकेदार रमेश गोरे यांच्यासह काही पत्रकार आणि खाजगी संस्थांचे कर्मचारी या सार्‍यांची नावं मजुरांच्या यादीत असल्याचं स्पष्ट झालंय.

 
हा प्रकार इतक्यावरच थांबलेला नाही, तर हजेरीपत्रकात स्थानिक मजुरांना रोजगार उपलब्ध करुन न देता परगावच्या मजुरांच्या नावावर बिलं काढल्याचा धक्कादायक प्रकारही उघडकीस आलाय. वरिष्ठ अधिकारीच संबंधितांना पाठिशी घालत असल्याचा आरोप नागरिक करताहेत. या सर्व गैरप्रकाराबाबत तहसिलदारांकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. सत्ताधारी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातली ही मिलीभगत मात्र इथल्या नागरिकांच्याच जीवावर उठलेली दिसतेय. त्यामुळे या सर्वच कारभाराची सरकारनं तातडीनं चौकशी करावी अशी मागणी इथले नागरिक करत आहेत.

 

 
रस्ते आणि खर्चाची किंमत

  • आगसखाड ते दुलेचादगाव रस्ता- 24 लाख
  • धामणगाव ते वनदेव रस्ता-10 लाख 67 हजार
  • इजिमा ते गागर्डी वस्ती-19 लाख
  • डमाळवाडी ते पिरेवाडा-17 लाख
  • भापकर वाडी ते आल्हानवाडी -15 लाख
  • पानखडे वस्ती ते घोरपडे वस्ती-5लाख
  • पाणपोई ते मोरे वस्ती – 12 लाख

 

  • rahul

    man vs wild in ahmednagar…..

close