‘जाच’पंचायत, 20 वर्षांपासून गोरीवले कुटुंब गावाबाहेर !

September 26, 2013 10:35 PM0 commentsViews: 889

शिवाजी गोरे, रत्नागिरी
26 सप्टेंबर : गावातल्या जातपंचायतीच्या आदेशानुसार एखाद्या कुटुंबाला वाळीत टाकण्याचे प्रकार कोकणातही सुरू आहेत. दापोलीमधल्या मुरडी गावातही एका कुटुंबाला गेला 20 वर्षांपासून वाळीत टाकलेलं आहे. दापोलीजवळच्या मुरडी गावच्या चाचलवाडीतले रामचंद्र गोरीवले गेल्या 20 वर्षांपासून गावाबाहेरच्या शेतात राहत आहे. गावातल्या लाकूडतोडीची खबर वनविभागाला दिली म्हणून गावबैठक बोलावून त्यांना दंड सुनावला गेला.

तेव्हापासून गोरिवलेच्या कुटुंबाला गावातल्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी करून घेतलं जात नाही. पण यापेक्षाही संतापजनक अनुभव त्यांच्या वाट्याला आलाय. 14 सप्टेंबरला त्यांच्या पत्नीचं निधन झाल्यानंतर अंत्यविधीसाठी त्यांना गावातलं स्मशानही नाकारण्यात आलं. विशेष म्हणजे या सगळ्या प्रकारात गावचा सरपंच आणि गाव अध्यक्षही सामील आहेत.
14 सप्टेंबरला मी सरपंचाला फ़ोन लावला की असं झालेलं आहे तेव्हा मला सहकार्य कराल काय. तर सरपंच म्हणाला की गाव अध्यक्षाला विचारा. मी गाव अध्यक्षाला विचारलं तर त्याने सांगितलं की वीस वर्षांपूर्वी तुला जो दंड झालाय त्याची रक्कम व्याजासह समाजाकडे भरावी लागेल तरच आम्ही तुला सहाय्य करू . मग मी काय करणार..? माझ्या ओळखीच्यांना बोलावून इथेच घराशेजारी मला दहनविधी करावे लागले अशी व्यथा रामचंद्र गोरिवले यांनी मांडली.

आपल्याच समाजातल्या पुढार्‍यांच्या दहशतीमुळे गोरिवलेंनी या सगळ्या प्रकाराबाबत अजून पोलीस तक्रारही केलेली नाही. पोलिसांनी या सगळ्या प्रकरणात आता स्वत: लक्ष घालून कारवाई करावी, अशी अपेक्षा य कुटुंबाने व्यक्त केलीय.

close