डॉकयार्ड इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा 11 वर

September 27, 2013 7:23 PM0 commentsViews: 829

dockyard27 सप्टेंबर :मुंबईत डॉकयार्ड इमारत दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झालाय. तर 41 जण जखमी झाले आहे. बचावकार्य अजूनही सुरू आहे. मृतांच्या नातेवाईकांसाठी महापौर सुनील प्रभू यांनी 2 लाखांची मदत जाहीर केलीय. जखमींचा खर्चही महापालिकाच उचलणार आहे.

वेळ पहाटे 5.30 ची… बीएमसीचे कर्मचारी राहत असलेली डॉकयार्ड रोडवरची महापालिकेच्या मालकीची चार मजली इमारत अक्षरशः पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. मुंबई महापालिकेच्या वसाहतीच्या या इमारतीत 22 कुटंबं रहायची. ही इमारत 1980 ला बांधली. पण गेल्या 33 वर्षांत या इमारतीचं एकदाही स्ट्रक्चरल ऑडिट झालं नाही, अशी तक्रार रहिवांशांनी केलीये. या घटनेनंतर ताबडतोब अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. डॉककार्ड रोडची यंत्रणा आणि एनडीआरएफ टीमही कामाला लागली. तात्काळ बचावकार्य सुरु झालं.

या इमारतीला अतिधोकायदायक म्हणून घोषित केलं होतं, असं आयुक्त सांगत असले तरी पालिकेनं धोकादायक इमारतींची जी यादी प्रसिद्ध केली होती. त्यात मात्र या इमारतीचा समावेशच नाही. खुद्द महापौरांनीच तसं सांगितलंय. या इमारतीच्या पुनर्विकासचा वादही समोर आलाय. बीएमसीचे काही अधिकारीच या कामात खोडा टाकत असल्याचा गंभीर आरोप बिल्डरनं केलाय.

प्रशासनाचा हा अक्षम्य हलगर्जीपणा आज निष्पापांच्या जीवावर उठलाय. दुर्घटनेतल्या जखमींचा सर्व खर्च महापालिका उचलणार आहे. तर मृतांच्या कुटुंबीयांना महापालिकेनं 2 लाख रुपयांची मदतही जाहीर केलीय. पण या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या धोकादायक इमारतींचा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे.

close