दिल्लीतलं सरकार आई, मुलगा आणि जावायाचं -मोदी

September 29, 2013 2:53 PM0 commentsViews: 1963

narendra modi29 सप्टेंबर :दिल्लीत एक काँग्रेसचं सरकार आहे त्यामध्ये एक आईचं सरकार आहे, मुलाचं सरकार आहे आणि आता जावई पण आहे. हे इथंच थांबलं नसून या सरकारला पाठिंबा देणार्‍या पक्षातला नेता स्वत: पंतप्रधान आहे त्यामुळे देशाला पंतप्रधान सरदार लाभलाय पण ते असरदार नाही अशी घणाघाती टीका गुजरातचे मुख्यमंत्री भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी केली.

दिल्लीत रोहिणी इथं जपानी पार्कमध्ये झालेल्या एका रॅलीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी नेहमी प्रमाणे यूपीए सरकार, राहुल गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंग, कोळसा घोटाळा आदी विषयांवर टीकास्त्र सोडले. मोदी म्हणतात, या सरकारला ज्या पक्षांनी पाठिंबा दिला तो त्या पक्षांचा पंतप्रधान बनलाय. कोणतेही सरकार हे बहुमतावर चालते. पण या सरकारकडे बहुमत असूनही यांच्यात एकता नाही. सगळे जण एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहे. सगळे जण वेगवेगळ्या मार्गाने निघाले आहे. त्यामुळे असल्या सरकारकडून काहीही अपेक्षा ठेवता येणार नाही. कोळसा घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा, टू जी घोटाळा अशी अनेक प्रकरण उघडकीस आली. जशी एखाद्या व्यक्तीला व्यसनाची सवय असती तसं या सरकारला भ्रष्टाचाराची लागली आहे. त्यामुळे या देशाला पंतप्रधान सरदार जरी लाभला असला ते असरदार नाही अशी टीका मोदींनी केली.

तसंच दिल्लीत सगळ्यात सुखी दिल्लीच्या मुख्यमंत्री आहे. त्यांना सिंचन, कृषी,शेतकर्‍यांच्या बाबतीत काहीही घेणं देणं नाही. त्यामुळे त्या फक्त लालफिती कापण्याचं काम करतात. दिल्लीत जेव्हा सामूहिक बलात्कारासाठी घटना घडली तेव्हा मला दुख झालं मी पण एक आई आहे अशी प्रतिक्रिया या मुख्यमंत्री देतात आणि मुलींनी संध्याकाळी घरी लवकर या असा सल्ला देता. कोणती आई, कुटुंब आपल्या मुलीला असा सल्ला देतं. तुम्ही या राज्याच्या मुख्यमंत्री आहात या नात्यानं तुमची काही जबाबदारी आहे की, नाही असा सवालही मोदींनी विचारला.

मोदींनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावरही निशाणा साधला. मनमोहन सिंग हे गावठी महिलेसारखे असून अमेरिकेकडे जाऊन पाकची तक्रार करतात अशी टीका नवाझ शरीफ यांनी केली होती असा आरोप मोदींनी केला. त्यांच्या टीकेचा मोदींनी आपल्या भाषेत समाचार घेतला. आमच्यात काहीही वाद असेल पण बाहेरच्या आणि ते पण पाकच्या पंतप्रधानांनी आमच्या पंतप्रधानांविषयी काहीही बोलू नये. तुमची लायकी तरी आहे का असा खडा सवाल मोदींनी उपस्थित केला. दिल्लीत मोदींच्या सभेसाठी भाजपने जोरदार तयारी केली होती. शहरभरात पोस्टरबाजी करण्यात आली होती पण मुख्य सभेला भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या शिवाय कोणताही बडा नेता सभेकडे भिरकला नाही.

close