दिग्दर्शक राजीव पाटील यांचं निधन

September 30, 2013 4:37 PM0 commentsViews: 2891

rajeev patil30 सप्टेंबर : : पांगिरा, जोगवा, 72 मैल, सावरखेड-एक गाव असे दर्जेदार सिनेमे देणारे दिग्दर्शक राजीव पाटील यांचं ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालंय. ते 40 वर्षांचे होते. राजीव पाटील यांना मुंबईतल्या भगवती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या प्रयोगशीलतेमुळे वेगळा ठसा उमटवणारे दिग्दर्शक म्हणून राजीव पाटील यांना ओळखलं जायचं. सावरखेड एक गाव, सनई चौघडे, जोगवा ते आत्ताचा 72 मैल असे अनेक वेगवेगळे चित्रपट राजीव पाटील यांनी दिलेत. जोगवा हा चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.

 

मूळचे नाशिकचे असलेले राजीव पाटील यांची कारकीर्द नाशिकच्या प्रयोग परिवारच्या च्या नाटकांमधून सुरू झाली. शाम मनोहर यांच्या नाटकांचं सादरीकरण त्यांनी केलं. ही सादरीकरणं मुंबई तसंच दिल्लीच्या नाट्यमहोत्सवातही केली.

 

बेधुंद मनाच्या लहरी, तसंच पिंपळपान या मालिकांचे पटकथा, संवाद त्यांनी लिहीले होते. ‘सावरखेड एक गाव’ हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट. त्या काळातला हा बिग बजेट चित्रपट होता. वेगवेगळ्या विषयांवरचं अफाट वाचन हे राजीव पाटील यांचं खास वैशिष्ट्य होतं. ‘वंशवेल’ हा त्यांचा आगामी चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. राजीव पाटील यांच्यावर उद्या नाशिकमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत.

 

राजीव पाटील… नेहमीच वेगळ्या विषयांवर सिनेमे करण्यासाठी प्रसिद्ध असलेले एक गुणवंत दिग्दर्शक..मूळचे नाशिकचे असलेले राजीव पाटील यांची कारकीर्द नाशिकच्या प्रयोग परिवारच्या नाटकांमधून सुरू झाली. शाम मनोहर यांच्या नाटकांचं सादरीकरण त्यांनी केलं. ही सादरीकरणं मुंबई तसंच दिल्लीच्या नाट्यमहोत्सवातही वाखाणली गेली. बेधुंद मनाच्या लहरी आणि पिंपळपान या मालिकांच्या पटकथा आणि संवाद त्यांनी लिहिले. एव्हाना राजीव यांना मोठा पडदा खुणावू लागला होता.

 

‘सावरखेड एक गाव’ हा दिग्दर्शक म्हणून त्यांनी केलेला पहिला चित्रपट गाजला. आणि मग त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. ‘सनई चौघडे’सारखा नात्यांवर आधारित आणि लोकप्रिय सिनेमा त्यांनी बनवला. पण या प्रतिभावंत कलाकाराच्या अल्प आयुष्यातला सगळ्यांत महत्त्वाचा सिनेमा ठरला तो ‘जोगवा’.

 

‘जोगवा’ने राजीवना राष्ट्रीय पातळीवर ओळख दिली. या सिनेमाला 5 राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. त्यानंतर ‘पांगिरा’ आणि ’72 मैल एक प्रवास’ या दोन्ही सिनेमांना प्रेक्षक आणि टीकाकारांनी पसंती दिली. आताही ‘वंशवेल’ या सिनेमाच्या गडबडीत असतानाच त्यांनी अनपेक्षित एक्झिट घेतली.

 

धाडसी विषयांना हात घालणारा, सामाजिक विषयांवर प्रकाश टाकणारा, मानवी भावभावनांच्या आणि नातेसंबंधांच्या खोलात जाऊ शकणारा.. एक हरहुन्नरी दिग्दर्शक आज हरपलाय. वयांच्या अवघ्या चाळिशीतली ही एक्झिट मनाला चटका लावून जाणारी आहे. पण त्यांच्या कलाकृतीतून राजीव पाटील नेहमीच प्रेक्षकांच्या मनात राहतील.

close