जन्मदात्यांची काळजी न घेणार्‍यांची सरकार घेणार झाडाझडती

September 30, 2013 9:00 PM1 commentViews: 490

elders330 सप्टेंबर : आपल्या मुलांसाठी राबराब राबून त्यांचे लाड, हट्ट पूरवण्यात प्रत्येक आई-वडिलांचं आयुष्य खर्ची जातं..पण ज्यांना लहानांचं मोठं केलं शिकवलं, संसार थाटून दिला त्यांनाच आपल्या जन्मदात्यांना सांभाळता येत नाही किंवा त्यांना त्यांचा विसरच पडतो अशा मुलांना धडा  शिकवण्यासाठी राज्य सरकारने नवे धोरण लागू केले आहे.

 

या धोरणानुसार जी मुलं आपल्या पालकांची काळजी घेणार नाहीत त्यांची चौकशी करून त्यांची नावं वर्तमानपत्रात जाहीर करण्यात येतील असा महत्त्वाचा निर्णयही या धोरणांअंतर्गत घेण्यात आला आहे. आज राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज ज्येष्ठ नागरिक धोरणाला मंजुरी देण्यात आली.

 

ज्येष्ठ नागरिकांचं आयुष्य सुरळीत जावं यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. त्यांच्यासाठी महिना 600 रुपये मदत, 24 तास हेल्पलाईन, हॉस्पिटलमध्ये आरक्षण, पोलीस दलाची मदत अशा काही महत्त्वाच्या तरतुदी त्यामध्ये आहेत.
 धोरणातल्या तरतुदी
– राज्यातल्या 15 लाख ज्येष्ठ नागरिकांना होणार लाभ
– ज्येष्ठांच्या सुरक्षा आणि आरोग्याला प्राधान्य
– प्रत्येक तालुक्यात ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र
– सर्व विभागांकडे या धोरणाच्या अंमलबजावणीची जबाबदारी
– रूग्णालयात उपचार आणि दाखल करून घेताना ज्येष्ठांना प्राधान्य
– संजय गांधी निराधार योजनेंतर्गत ज्येष्ठांना दरमहा 600 रूपये
– ज्येष्ठांच्या सुरक्षेसाठी पोलीस खात्याची मदत घेण्याची तरतूद
– रूग्णालयं आणि जवळच्या पोलिस ठाण्यात ज्येष्ठ नागरिकांच्या नावाची यादी राहणार
– मनोरंजन व विरंगुळा योजना
– नागरी क्षेत्रातील गृहनिर्माण संकुलात विरंगुळा व स्मृतीभ्रंश केंद्राची सुविधा अनिवार्य
– शहरांचा मित्र वृचे जगणे सुसह्य करण्यासाठी शहराचा वृद्ध मित्र म्हणून विकास करण्याची जागतिक आरोग्य संघटनेची संकल्पना स्थानिक स्वराज्यसंस्थामार्फत अमलात आणणे.
– बसमध्ये किमान 4 आसने आरक्षित
– महापालिका ,नगरपालिकांत ज्येष्ठ नागरिक कक्ष
– सिनेमागृह,नाट्यगृहे येथे किमान 10 आसने आरक्षित
– आरोग्यविषयक योजना निराधार व दारिद्र्यरेषेखालील ज्येष्ठांना विनाशुल्क
– सवलतीच्या दरात उपकरणे व जेनरिक औषधे
– विरंगुळा केंद्रात फिजिओथेरपी,नेत्र तपासणी ,योगासने, आरोग्यशिबिर यांचे आयोजन, तसंच रक्तदाब व रक्तशर्करा तपासणीची सोय.
– महाराष्ट्रात 3.50 लाख ज्येष्ठ स्मृतीभ्रंशाने त्रस्त. ही संख्या 2026 पर्यंत दुप्पट होणार त्यामुळे सुश्रुषा सेवकांना प्रशिक्षण कार्यक्रम
– इंदिरा आवास योजनेतून एकटे राहणार्‍या वृद्धांना घरकुलासाठी 68,500 रूपये अनुदान
– जिल्हा क्षेत्रात वृध्दांश्रमांसाठी जागेचे आरक्षण
– ज्येष्ठ नागरिकांबाबत समाजात जनजागृती
– ज्येष्ठ नागरिकांबाबत जागृती करण्यासाठी तीन दिवस राज्यात पाळण्यात येतील.
विशेष दिवस
– 5 जून – ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक जागृती दिवस
– 21 सप्टेंबर – जागतिक अल्झायमर दिवस
– 1 ऑक्टोबर – जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन

 • Nishant Potdar

  सर्वात पहिले घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतो. अश्या कायद्याची खरेच आवशकता आहे आजच्या काळात.जिथे आई वडील मुलांना लहानाचा मोठा करतात आणि मोठे झाल्यावर मुलगा/मुलगी त्यांना
  वृद्धाश्रमात पाठवून त्यांचे पांग फेडतात. तर अशा संततीला नक्कीच प्रतिबंध बसेल या
  निर्णयामुळे. परंतु प्रश्न येतो कितपत? खरेच हा कायदा कितपत योग्य आहे याचा पण आपण
  विचार केला पाहिजे. अशा वेळेस आपण नाण्याच्या दुसऱ्या बाजूचा सुद्धा विचार करूयात.

  आज समाजात अनेक प्रवृत्ती आहेत, जिथे वडिलच मुलीवर अत्याचार करतात, छळ करतात. काही वेळेस तर आईच असे करण्यास मदत करते. आणि समझा अशाच एका मुलीने तिच्यावर झालेला अन्याय लक्षात ठेऊन जर पुढे गेल्यावर त्यांना चुकीची वागणूक दिली तर दोषी कोण? वडील? कि
  ती मुलगी जीने अब्रू वेशीवर टांगली जाऊ नये म्हणून अत्याचार सहन केले? काही वेळेस
  वृद्ध पण अत्त्याचारी असतात मग त्यांचे काय? त्यांचे सुद्धा नाव defaulter म्हणून जाहीर केले जाणार का? मी कबुल करतो कि जे काही लिहीत आहे ते काही जणांना खटकण्यासारखे आहे, बरेच जण असहमत असणार हे नक्कीच, पण आपण नाण्याची दुसरी बाजू देखील समझुन घेतली पाहिजे.

  आता दुसरा प्रसंग पाहू.
  जिथे वडील मुले लहान असल्यापासून सतत् दारू पिउन येतात, मुलांचा छळ करतात, पौगंडावस्थेतील
  मुलांना समझुन न घेता सतत शिव्या देऊन त्यांना वागवतात आणि त्यांच्या आयुष्याची
  माती करण्याचा सतत प्रयत्न करतात, जवळ मुबलक पैसे असूनही त्यांना शिक्षणासाठी पैसे
  देत नाहीत आणि त्याही परीस्थित ती मुले समोर आलेल्या परीस्थीतीला सामोरे जाऊन कष्ट
  करून पैसे जमवून त्यांचे शिक्षण पूर्ण करतात, पुढे जाण्याची कास धरतात मग अशा
  स्वाभिमानी मुलांनी जे त्यांच्या सोबत झाले ते विसरायचे का? चला ते हि करून आई
  वडिलांना सांभाळले आणि तरी आई वडील जर मुलांनाच दोष देत असतील आणि समाजात
  मुलाबद्दल सतत खोटे सांगून अपप्रचार करत असतील तर त्याला दोषी कोण? मुलगा कि आई
  वडील?
  वरील उदाहरणातील व्यक्तींना कायद्याने जरी निर्णय दिला कि जेष्ठाचा सांभाळ करावा ते करतील हि पण प्रश्न उभा राहतो कि त्यात किती टक्के प्रेम असेल?

  माझे स्वताचे असे तरी मत आहे कि वडिलधाऱ्यांनी सुद्धा समजूतदारपणा दाखवला आणि अहंकार न ठेवता आजच्या पिढीला समजून घेतले आणि थोडेफार त्यांच्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न केला
  तर अनेक प्रश्न असेच सुटतील आणि सर्वांचे प्रेम सुद्धा अखंड राहील.
  येथे मी फक्त विचार करून दुसरी बाजू मांडली आहे, आपण फक्त एकच बाजू बघतो जी फक्त डोळ्यांना
  दिसते पण काहीवेळेस जसे दिसते तसे नसते हे देखील तितकेच कटू सत्य आहे.

  जर माझ्या मतामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील त्याबद्दल क्षमस्व.
  धन्यवाद,

  निशांत पोतदार

close