लालूप्रसाद यादव यांचा उदय आणि अस्त !

September 30, 2013 11:24 PM0 commentsViews: 1506

30 सप्टेंबर : चारा घोटाळ्याप्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना कोर्टानं दोषी ठरवलंय. त्यांच्यासोबतच एकूण 45 जणांना कोर्टानं दोषी ठरवलं. लालू प्रसाद यादव यांच्यासारख्या बड्या नेत्याला दोषी ठरवण्यात आल्यानं राजकारणातलं गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी हा निकाल महत्त्वाचा मानला जातोय. कारण आता त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल, अशी दाट शक्यता आहे.

राजकीय समीकरणं बदलत असल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागलेत. जुन्या मित्रांना अतिशय शिताफीनं बाजूला सारून नव्या मित्रांसाठी मार्ग प्रशस्त करण्यात येतोय.

सरकारनं दोषी लोकप्रतिनिधींबाबत वटहुकूम काढला. लालूंच्या गांधी कुटुंबावर असलेल्या निष्ठेचं बक्षीस म्हणून या वटहुकुमाकडे बघितलं गेलं. पण, या वटहुकुमावर काँग्रेस उपाध्यक्षांनीच तोफ डागल्यानं केल्यानं लालूंना असलेली आशा धुळीला मिळाली.

जय प्रकाश नारायण यांच्या चळवळीतून लालू प्रसाद यादव यांचा राजकीय पटलावर उदय झाला. 1970च्या दशकात विद्यार्थी नेते म्हणून त्यांनी सुरुवात केली. पुढे त्यांनी मुस्लीम आणि यादव या व्होटबँकेवर आपली पकड मजबूत केली आणि 1977मध्ये सर्वात तरूण खासदार म्हणून लोकसभेत प्रवेश केला. 1990मध्ये पहिल्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. रथ यात्रेदरम्यान भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांना अटक करून ते धर्मनिरपेक्ष राजकारणातले आघाडीचे नेते बनले. लालूंच्या घोडदौडीला लगाम लागली ती जंगल राज आणि साडे नऊशे कोटींच्या चारा घोटाळ्यानं..त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं. पण, आपल्या पत्नीला, राबडी देवींना, मुख्यमंत्री करत त्यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आणि त्यानंतर त्यांनी कमबॅक केलं. पण, लालू आता ज्या वळणावर उभे आहेत तिथून कमबॅक करणं, त्यांच्यासाठी फारच कठीण दिसतंय.

बिहारमध्ये 15 वर्षं सत्ता ते भारताचे रेल्वे मंत्री अशी अनेक मोठी पदं भूषवत त्यांनी अनेक वर्षं सत्ता सुख उपभोगलं. बोलण्याची खास बिहारी शैली आणि ग्रामीण तोंडवळा यामुळे लालू नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात राहिले. एका अर्थाने ते भारताचे पहिले टेलीव्हिजन-राजकारणी होते.

आज त्यांच्या अटकेमुळे त्यांच्या पक्षापुढेच अस्तित्वाचं संकट उभं राहिलंय. त्यांनी आपल्या मुलांना राजकारणात आणलं असलं तरी निवडणुकीच्या राजकारणाची अग्निपरीक्षा ते पार करतात का, हा प्रश्नच आहे.

close