लोकप्रतिनिधींना वाचवणारा वटहुकूम मागे?

October 1, 2013 8:10 PM0 commentsViews: 510

rahul gandhi delhi pc3101 ऑक्टोबर : दोषी लोकप्रतिनिधींना वाचवणार्‍या वटहुकुमाबाबत नवी दिल्लीत घडामोडींना वेग आलाय. राहुल गांधींनी लगावलेली चपराक आणि विरोधकांनी केलेली टीका यानंतर हा वटहुकूम उद्या मागे घेतला जाण्याची शक्यता आहे.

 

अमेरिका दौर्‍यावर असलेले पंतप्रधान आज रात्री उशिरा भारतात परततील. त्यानंतर उद्या ते केंद्रीय मंत्रिमंडळात या वटहुकुमावर चर्चा करणार आहेत. या बैठकीच्या आधी काँग्रेसच्या कोअर ग्रुपचीही बैठक होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेणार आहेत. पण वटहुकुमावर चर्चा करण्यासाठी यूपीए समन्वय समितीचीही बैठक बोलवावी, अशी मागणी नॅशनल कॉन्फरंसचे ओमर अब्दुल्ला आणि राष्ट्रवादीने केलीय.

 

सुप्रीम कोर्टाने गुन्हेगार लोक प्रतिनिधींना आळा बसावा यासाठी एखादा लोकप्रतिनिधी गुन्ह्यात दोषी आढळला तर त्यांची खासदरकी, आमदारकी रद्द करण्यात यावी असा आदेश दिला होता. मात्र सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाच्या विरोधात जाऊन केंद्रीय मंत्रिमंडळाने वटहुकूम काढून लोकप्रतिनिधींना दिलासा दिला. पण दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी हा वटहुकूम नॉन्सेस असून तो फाडून फेका असं सांगत आपल्याच पक्षाला घरचा अहेर दिला.

 

मात्र यामुळे पंतप्रधान मनमोहन सिंग यांची नाचक्की झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या भूमिकेमुळे वटहुकूम मागे घेण्याची शक्यता आहे. पण याचा फटका लालूप्रसाद यादव यांना बसला आहे. जर हा वटहुकूम रद्द झाला तर लालूंचं राजकीय कारकीर्दचं संपुष्टात येईल आणि आता त्यांच्या पाठोपाठ काँग्रेसचेच नेते रशीद मसूद यांची खासदारकी रद्द होणार आहे.

close