याला ‘बापू’ म्हणू नका !

October 1, 2013 11:41 PM5 commentsViews: 4459

jatin_desai_150x150-जतीन देसाई पत्रकार आणि पाकिस्तानातील राजकीय घडामोडींचे विश्लेषक

गेल्या महिन्यातली गोष्ट. मी आणि माझा पत्रकार मित्र प्रकाश अकोलकर गुजरातच्या दौर्‍यावर गेलेलो. अहमदाबाद आणि सौराष्ट्रात आम्ही खरंच फिरलो. भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदींना आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला, त्यापूर्वी हा दौरा झाला. मात्र गुजरातमधील भाजपच्या कार्यकर्त्यांना खात्री होती की, लवकरच भाजप मोदींना आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करेल आणि झालंही तसंच. मोठ्या प्रमाणात लोकांना भेटण्याची आणि त्यांच्याशी बोलण्याची संधी आम्हाला मिळाली. गुजरात येथील लोक नेमका काय विचार करतात, हे समजण्यात याची मदत झाली. अहमदाबाद येथे शाही बाग परिसरात सरकारी सर्किट हाऊस आहे. आम्हाला तिथून साबरमती आश्रमात जायचं होतं. ऑटोवाल्याला आश्रम येणार का? विचारलं.

 
त्याने लगेच प्रश्न केला की कुठला आश्रम? गांधी की आसाराम? मी त्याला म्हटलं, ‘स्वाभाविकच गांधी आश्रम’. आम्हाला आश्चर्य वाटेल असं तो म्हणाला, ‘बरं झालं, तुम्ही गांधी आश्रमात जात आहात. मी माझ्या ऑटोत आसारामच्या आश्रमात जाणार्‍या प्रवाशाला घेत नाही. तो ‘चालू’ आहे आणि लोकांना लुबाडतो’. ऑटोवाल्यासाठी त्याचा पॅसेंजर सर्वस्व असतो. हा ऑटोवाला मात्र आपल्याला प्रवासी नाही मिळाला तरी चालेल, असं म्हणणारा निघाला. नंतर इतर काहींशी बोलणं झालं. प्रत्येकाचं आसारामबद्दल वाईट मत येत होतं. त्याला कारणही आहे. अहमदाबाद, सुरत येथे आसाराम आणि त्याच्या आश्रमाने गरीब शेतकर्‍यांची जमीन लुटली असल्याची तक्रार काही जणांनी पूर्वीच पोलिसांत केली आहे.

 

न्यायालयात देखील खटले सुरू आहेत. आसारामच्या एका आश्रमातून दोन अल्पवयीन मुलांचे शव मिळालेले. याशिवाय महिलांवर अत्याचार होत असल्याच्या येणार्‍या अहवालांनी देखील गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे हुशार राजकारणी असल्याने त्यांच्या लक्षात ही गोष्ट लगेच आली. एकेकाळी नरेंद्र मादींचे आसारामशी बर्‍यापैकी संबंध होते. मात्र यावेळेस आसारामला अटक होण्यापूर्वी किंवा अटक झाल्यानंतर मोदींनी त्याला वाचविण्याचा कुठेही प्रयत्न केला नाही. काही वर्षांपूर्वी गुजरातच्या डांग येथे शबरी मंदिर बनविण्यात आलेलं. त्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात आसारामही होते आणि मोदीही, याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार होतो. आता परिस्थितीही बदलली आहे आणि चित्रही. आसारामसोबत राहणं मोदींसाठी आश्चर्यच आहे.

asaram bapu
मीडियानं आसारामचा उल्लेख कसा करावा, हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. अनेक वर्षांपासून त्यांचा उल्लेख आसाराम बापू म्हणून करण्यात येतो. मीडियानं याचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. वयस्कर आणि ज्यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे अशा पुरुषाला बापू म्हणण्यात येतं. गुजरातमध्ये बापू या शब्दाचा वापर खूप प्रमाणात केला जातो. कुठल्याही निकषाचा बापू हा शब्द आसारामच्या बाबतीत लागू पडत नाही. आसाराम आणि त्याचा मुलगा नारायण साईच्या विरोधात वेगवेगळ्या न्यायालयांत खटले चालू आहेत. आसारामच्या विरोधात लोक उघडपणे बोलत आहेत. आसारामच्या देशभरातल्या आश्रमांची किंमत कोट्यावधीत नाही तर अब्जावधीत आहे. या सर्व कारणांमुळे मीडियानं मात्र आसाराम असाच त्याचा उल्लेख केला पाहिजे. काही वर्तमानपत्रं आणि टीव्ही चॅनल्सनी आसाराम एवढाच उल्लेख करायला सुरुवात केली आहे, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. इतर मीडियादेखील लवकरच अशी सुरुवात करेल, अशी आशा बाळगायला हरकत नाही.

 

महाराष्ट्राप्रमाणे गुजरातमध्ये देखील अनेक ‘संत’, ‘बाबा’ आहेत. आपला समाज मुळात धार्मिक असल्यानं त्यांच्या भावनेशी खेळणं या बाबा, संतांना सहजशक्य होतं. ‘बाबा’ हा मोठा व्यवसाय झाला आहे आणि त्यात कधीही मंदी येत नाही. आसारामच्या विरोधात गुजरातेत दिसत असलेलं वातावरण इतर ‘बाबां’च्या विरोधात पण निर्माण होणं आवश्यक आहे.
मुंबईत महिला पत्रकारावर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या विरोधात गुजरात येथे देखील लोक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात उतरले. पत्रकारांनी साबरमती आश्रमात तर इतर नागरिकांनी अहमदाबाद शहराच्या मध्यभागी निदर्शनं केली. आम्ही त्या दोन्ही निदर्शनात सहभागी झालो. सर्वत्र लोकांमध्ये अस्वस्थता जाणवत होती. अहमदाबाद येथे ट्रॅफिकचा सर्वात मोठा प्रश्न असायचा. येथे बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम (बीआरटीएस) सुरू करण्यात आली आणि ती अत्यंत प्रभावी आणि परिणामकारक आहे. यामुळे प्रवास सुरळीत होण्यास मदत झाली आहे. भारतात दिल्लीसह काही शहरांत बीआरटीएस यशस्वी झाली नाही, पण अहमदाबाद त्याला अपवाद आहे. बीआरटीएसनं लोक खूश आहेत.

 

एका गोष्टीचं मला नेहमी आश्चर्य वाटत आलं आहे आणि ते म्हणजे शाकाहारीचा आग्रह. मी स्वत: शाकाहारी आहे. पण त्याचा अट्टहास होता कामा नये. गुजरात सरकारच्या कुठल्याही सर्किट हाऊसमध्ये सकाळच्या नाश्त्यात किंवा जेवणात अंडं किंवा इतर मांसाहारी खाणं मिळत नाही. ही पद्धत नरेंद्र मोदींच्या काळात नाही पण केशुभाई पटेल मुख्यमंत्री असताना सुरू झाली आणि ती आजतागायत चालू आहे. मोठ्या हॉटेलात देखील श्रावण महिन्यात मांसाहारी जेवण मिळणं सोपं नाही. सौराष्ट्रात आम्ही मच्छीमारांचे पाहुणे होतो. पण आश्चर्य म्हणजे मच्छीमार समाजदेखील मोठ्या प्रमाणात श्रावण महिन्यात मासे खात नाही. आमच्यासोबत असलेल्या दोन जर्मन पाहुण्यांना याचं खूप आश्चर्य वाटलं.

 
मासे पकडावे श्रावण महिन्यात मासे खात नाहीत ही कल्पनाच करणं त्यांना कठीण जात होतं. ही प्रथा कधी सुरू झाली असेल, हा प्रश्न आम्हा सर्वांना पडला. याचं उत्तर मिळणं सोपं नव्हतं. वेगवेगळे लोक यासंबंधी वेगवेगळी मतं व्यक्त करत होती. शाकाहारीला गुजरातमध्ये जेवढं महत्त्व मिळतं तेवढं इतर कुठल्याही राज्यात मिळणं शक्य नाही.
राज्यात दारूबंदी असली तरीही थोडा प्रयत्न केल्यास दारू सहज उपलब्ध होऊ शकते. राजकीय भांडवल आकर्षित करण्यासाठी विदेशी नागरिकांचं राज्यात येणं गरजेचं आहे. किमान त्यांच्यासाठी दारूची व्यवस्था कशी करता येईल, हा सरकारसमोर प्रश्न आहे. रस्ते आणि विजेच्या क्षेत्रात गुजरातनं केलेली प्रगती राज्यात प्रवास करताना सतत जाणवते. 1,600 कि.मी.च्या प्रवासात समुद्रकिनारा असल्यानं बरीच बंदरं विकसित करण्यात आली आहेत. एकीकडे या क्षेत्रातील प्रगती आपल्याला दिसते तर दुसरीकडे प्रवास करण्यासाठी सामान्य लोक रिक्षासारख्या वाहनात दाटीवाटीनं प्रवास करताना आढळतात. सौराष्ट्रात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील आहे.

 • Tony

  Maharashtrat Baba khup zale Pan Sant khup thodech houn gele..

 • namuchi

  जतिन देसाई साहेब आपल्याला नक्की काय म्हणायचे…blog चे नाव – याला ‘बापू’ म्हणू नका ! – असे आहे…मग फक्त आसाराम वरच असेल असे वाटले…मधेच गुजरातचा विकास आणि त्यातली कमतरता कोठून आली…ह्यचा आणि असरामचा काही संबंध आहे का…गुजरातचा विकास आकडेवारी सहित आणि खरेच विकास झाला कि नाही हा वेगळ्या चर्चेचा विषय आहे … तो असारामच्या विषयात कशाला घुसडला…बर आसाराम बद्दल नवीन माहिती द्याल असे वाटले पण तीच जुनी माहिती सांगितली…असरामचा दहशतवाद पूर्वीपासून माहिती आहे…पूर्वीसारखा आता मोडीचा पाठींबा नसल्यामुळे आसाराम जेल मध्ये आहे…मोडीला आता कोणतेही झंझट नको म्हणून त्याने तात्पुरता आसाराम ला झिडकारला आहे…हे सर्वांनाच माहिती आहे…कदाचित त्या ऑटोवाल्याला जरी विचारले असते तरी त्याने हि माहिती दिली असती…साहेब, सगळ्याच डगरींवर हाथ ठेवला कि फजिती होते…

 • Santosh

  khup chaan lihile aahe.. pan aajkal ya goshti samjun ghenare lok kami
  jhale aahet. ashi mahiti krupya sarvanparyant pohchavi hi vinanti..

 • Deepak Wadghare

  Desai Sir, Kharach Dev aahe ka ho? ase Baba, Buva, Bapu,devi ani tyana pathisi ghalnare Rajkarni yanchi kiti mijas aste. tyanchya jivnamadhe kontyahi krutyala kadhihi kathor shiksha naste. Kaydyachya kachatyatun sahi salamat he lok sutatat, Nidan Devane tari yach janmamadhe tyanna shikshya karavi jyanchyavar anyay, atyachar ani Fasavnuk jhali asel tyana tari samadhan vatel. Devache sarvarthane kam karnare Dr. Dhabholkar jivanishi jatat, ani je Baba, Buva, devi Devachya navavar Samjavar varshon varsh Balatkar karat aale aahet te mast alishan Jeevan jagat aahet. tyana kashyachihe Bhiti nahi manun mazyasarkhya Lokansobat kam karnarya karyakartyala Dev aahe ka? asa prashna nehmi asto.

 • Anil Badgujar

  sir yat rajkaran ka aantat

close