मुंबै बँकेत 400 कोटींचा घोटाळा

October 2, 2013 3:33 PM0 commentsViews: 1310

mumbai bank02 ऑक्टोबर : मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँकेत 400 कोटींचा घोटाळा झाल्याचं उघड झालंय. बोगस कर्जवाटप, बेकायदा गुंतवणूकीद्वारे हा घोटाळा झाल्याचं प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालंय. यासंदर्भात अहवाल सहकार आयुक्तांना सादर करण्यात आला या अहवालात घोटाळा झाल्याचा ठपका ठेवण्यात आला.

 

मनसेचे आमदार प्रविण दरेकर आणि शिवाजी नलावडे यांच्यासह संचालक मंडळ आणि काही अधिकार्‍यांनी संगनमतानं नागरी सहकारी पतसंस्थांना केलेल्या बोगस कर्जवाटपामुळे बँकेचे 129 कोटी 33 लाख रूपये अडकलेत आणि या पैशाच्या वसुलीचीही शक्यता नाही असं या अहवालात म्हटलंय. संचालक मंडळानं सत्तेच्या स्वार्थासाठी गैरवापर केल्यामुळे बँकेचं प्रचंड नुकसान झालंय असा ठपका या अहवालात ठेवण्यात आलाय. प्रविण दरेकर हे मुंबै बँकेचे अध्यक्ष आहेत.

 

या घोटाळ्याला बँकेचे संचालक मंडळ आणि इतर अधिकारी जबाबदार आहेत, त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करा अशी शिफारस जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्थेच्या तपासणी अधिकार्‍यांनी केला. दरम्यान, मुंबै बँकेत कोणताही घोटाळा झालेला नाही. काही हितसंबंधींच्या तक्रारीवरून ही चौकशी करण्यात आलीय. हा बँक ताब्यात घेण्याचा डाव असल्याचा आरोप प्रविण दरेकर यांनी केला.

close