तेलंगणाविरोधात 72 तासांचा कडकडीत बंद

October 4, 2013 2:46 PM0 commentsViews: 292

04 ऑक्टोबर : तेलंगणावर वेगळ्या राज्याची मोहर उमटवण्यात आल्यानंतर अपेक्षेप्रमाणे आंध्र प्रदेशात त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. या निर्णयाच्या विरोधात सीमांध्रामध्ये 72 तासांचा बंद पुकारण्यात आलाय. दरम्यान, सीमांध्र भागात अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या आहेत.

 

telangana

पूर्ण 13 जिल्ह्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय. अनेक ठिकाणी टीडीपी आणि वायएसआर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामार्‍या आणि संघर्षाचे प्रकार घडले आहेत. तर विजय नगरम इथं पोलिसांना आंदोलकांवर लाठीचार्ज आणि हवेत गोळीबारही करावा लागलाय. या बंदमुळे परिवहन सेवा पूर्णपणे ठप्प झालीय. तर दुसरीकडे देशभरातून तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांना मात्र याचा फटका बसलाय. अनेक भाविक यामुळे अडकून पडले आहे.

मनुष्यबळ विकास मंत्री पल्लम राजूसह दोन केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामे
स्वतंत्र तेलंगणाचा प्रश्न आता आणखी पेटलाय. तेलंगणा निर्मितीला प्रखर विरोध करत वायएसआर (YSR) काँग्रेस अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांनी आता आणखी आक्रमक भूमिका घेतली आहे. स्वतंत्र तेलंगणाला आपला तीव्र विरोध असून उद्यापासून आपण आमरण उपोषण करणार असल्याचं जगनमोहन यांनी म्हटलंय.

 

तेलंगणाची निर्मिती फक्त मतांच्या राजकारणासाठी होत असल्याचा आरोप जगनमोहन यांनी केलाय. इतर पक्षांनीही या आंदोलनात सहभागी व्हावं अस आवाहनंही त्यांनी केलंय. वायएसआर काँग्रेसबरोबरच तेलुगू देसम पक्षानंही या निर्णयाला विरोध केलाय. काँग्रेसचे काही नेतेही नाराज आहेत. आज मनुष्यबळ विकास मंत्री पल्लम राजू यांनी पदाचा राजीनामा दिलाय. गुरूवारी वेगळ्या तेलंगणाची घोषणा झाल्यानंतर अभिनेता आणि केंद्रीय मंत्री चिरंजीवी यांनीही राजीनामा दिली होता.

close