पुणे पॅटर्न कायम – राष्ट्रवादीनं काँग्रेसला धुडकावलं

February 3, 2009 7:26 AM0 commentsViews: 2

3 फेब्रुवारी, पुणेअखेर पुणे महानगरपालिकेत पुणे पॅटर्न कायम राहणार आहे. सुरेश कलमाडी यांना बाजुला ठेवण्याची अजितदादा पवार यांची खेळी यशस्वी झाली आहे. पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष श्याम देशपांडे हेच पुणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अजितदादा पुण्याच्या राष्ट्रवादीचे पालक आहेत. सुरेशभाई कलमाडी हे काँग्रेसचे पुण्यातले चालक आहेत. या दोघांमधून विस्तवही जात नाही. या दादा-भाईंच्या राजकारणाचंच अपत्य म्हणजे पुणे पॅटर्न. 10 वर्षं पुण्यात कलमाडींचं राज्य होतं. पण दोन वर्षापूर्वीच्या महापालिका निवडणुकीत 144 जागांपैकी राष्ट्रवादीला मिळाल्या 48 जागा, काँग्रेसला 42 जागा, भाजपला 25, शिवसेनेला 21 तर मनसेला 8 जागा मिळाल्या. भाई नको म्हणून दादांनी शिवसेना भाजपला जवळ केलं. आणि आकड्यांचं हेच गणित पुणे पॅटर्न म्हणून गाजलं. त्यानंतर राष्ट्रवादीनं महापौरपद स्वतःकडे घेतलं. उपमहापौरपद शिवसेनेकडे ठेवलं तर भाजपला शिक्षणमंडळ दिलं. स्थायी समितीचं अध्यक्षपदही शिवसेनेकडे दिलं. यात काँग्रेसला काय मिळालं तर फक्त विरोधी पक्षनेते पद, तेही कोर्टाच्या आदेशामुळे, पण आता हेच स्थायी समितीच्या अध्यक्षाचे अधिकार राष्ट्रवादीने काढून घेतल्यामुळे पुणे पॅटर्न धोक्यात आलाय. शिवसेनेतल्या नाराजीचा फायदा सुरेशभाईंनी उचलायचं ठरवलं. ते शरद पवारांचं महत्त्व ओळखून आहेत. काका आवडतो पण पुतण्या नडतो अशी त्यांची सध्याची स्थिती आहे. शिवसेनेनं हिसका दिलाच तर राष्ट्रवादीलाही काँग्रेसकडेच जावं लागेल, पण स्वतःहून आपली किंमत का कमी करून घ्या, म्हणून ते सध्या गप्प आहेत. दुसरीकडे शिवसेनेलाही निवडणुकीच्या तोंडावर तुटेपर्यंत ताणून धरणं फायद्याचं नाही. सध्यातरी दादा-भाईंच्या या पुणेरी राजकारणात मातोश्रीवरूवन काय आदेश निघतायत याकडेच सगळ्यांचं लक्ष तर आहेच, पण या सगळ्यात आपण कुठे मागे राहू नये म्हणून भाजपही पळापळ करतंय. अशात पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष श्याम देशपांडे यांचे अधिकार काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं काढून घेतल्यानं पुणे पॅटर्न धोक्यात आला होता. स्थायी समितीच्या अध्यक्षांचे अधिकार मंगळवारपर्यंत परत न दिल्यास शिवसेना पुणे पॅटर्नमधून बाहेर पडेल, असा इशारा शहर प्रमुख नाना वाडेकर यांनी दिलाये.भाजपानंही संध्याकाळी सात वाजेपर्यंतचा अल्टीमेटम राष्ट्रवादीला दिलाय. दोन वर्षांपूर्वी पुणे महापालिकेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसचे खासदार सुरेश कलमाडी यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र येऊन आघाडी केली. ती पुणे पॅटर्न या नावाने गाजली. आगामी लोकसभा निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकत्र लढवायची असल्यानं पुणे पॅटर्नवर गंडांतर आलं होतं. पुणे पॅटर्न वाचवण्याचा प्रयत्नात शिवसेना-भाजपच्या इशार्‍यानंतर राष्ट्रवादी-शिवसेनेची बैठक मुंबईत झाली. या बैठकीत पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष श्याम देशपांडे यांचे अधिकार त्यांना परत देण्याचे ठरलेत. काँग्रेसला धुडकावत राष्ट्रवादी काँग्रेसनं पुणे पॅटर्न कायम ठेवला आहे. सत्तेसाठी आणि इगोखातर लोक कोणत्याही स्तराला जाऊ शकतात हे पुणे पॅटर्नमधून समोर आलं आहे.

close