रामचंद्र पुरूषोत्तम जोशी-एक फसलेली फँटसी

October 4, 2013 10:55 PM0 commentsViews: 998

अमोल परचुरे, समीक्षक
रामचंद्र पुरुषोत्तम जोशी…या सिनेमाचं मेकिंग म्हणजे अजय फणसेकरच्या जिद्दीची गोष्ट आहे. खरंतर या सिनेमाचं काम 2005 साली जवळपास पूर्ण झालं होतं, पण 26 जुलै रोजी मुंबईत आलेल्या महापुरात सिनेमाची रिळं खराब झाली आणि तरीही पुन्हा हा सिनेमा शूट करुन आता रिलीज होतोय. केलेलं काम वाया गेलेलं असतानाही खचून न जाता सिनेमाशी संबंधित सर्वांनी अजय फणसेकरला जे सहकार्य केलं ते खरंच कौतुकास्पद आहे. आता त्यानंतर जो सिनेमा बनलाय तो बघून असं वाटतं की, 2005 मध्ये जर हा ‘रापुजो’ आला असता तर कदाचित प्रेक्षकांना आवडला असता. आता या सिनेमातील इफेक्टस किंवा त्याची मांडणी ही आजच्या प्रेक्षकांना थोडी कालबाह्य वाटू शकते. सिनेमाची कल्पना एकदम मस्त आहे, ओरिजिनल आहे, पण ती पडद्यावर सादर करताना त्यात खूप मर्यादा आलेल्या आहेत. रात्र आरंभ किंवा हिंदीतला ‘एन्काऊंटर’ बनवताना जाणवलेला अजय फणसेकरचा ब्रिलियंस या ‘रापुजो’मध्ये दिसत नाही. ‘रापुजो’ बनवणारा अजय फणसेकर हा कथेपेक्षा टेक्निकल इफेक्टसच्या प्रेामत पडलाय आणि त्यामुळे सिनेमाची रंगत खूपच कमी झालीये.

ramchandra purushottam joshi
काय आहे स्टोरी?
थोडक्यात गोष्ट सांगायची तर, रामचंद्र पुरुषोत्तम जोशी यांना नरकातील चांगल्या वागणुकीमुळे यमानं पुन्हा पृथ्वीवर पाठवण्याचा निर्णय घेतलाय, पण केवळ आठ तासांसाठी. आपल्याच वर्षश्राद्धाला रापुजो आठ तासांसाठी पृथ्वीवर येतात आणि घरातलं उद्‌ध्वस्त वातावरण बघून त्यांना धक्काच बसतो. ही परिस्थिती त्यांना बदलता येते का? हे सिनेमातच पाहता येईल. इथं ‘रापुजो’ पृथ्वीवर येईपर्यंत नरकातला भाग बराच वेळ रेंगाळलेला आहे. आपल्या कल्पनेत असलेला स्वर्ग-नरक-यमलोक इथं दिसत नाही, वेगळंच विश्व आणि नवीन विचारांचा यम अजय फणसेकरने सादर केलाय. यात नावीन्य नक्कीच आहे, पण तो थोडा लवकर संपवायला हवा होता. रापुजो पृथ्वीवर आल्यानंतर ज्या घटना घडतात, त्या बर्‍याच प्रमाणात अपेक्षित वाटतात आणि त्यात तोचतोचपणा जाणवायला लागतो. काही वेळा मग परफॉर्मन्स वरचढ ठरतो तर काही वेळा पटकथेच्या कमजोर वाटायला लागते.

ramchandra purushottam joshi1
परफार्मन्स
‘रापुजो’मध्ये सर्वात जबरदस्त आहे तो सर्व कलाकारांचा अभिनय…दिलीप प्रभावळकर यांचं कॅरेक्टर म्हणजेच रामचंद्र पुरुषोत्तम जोशी हे एक सरळसाधं व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे प्रभावळकरांना यात काही गेटअप वगैरे नाहीये, पण क्लायमॅक्सला संतापलेले, खवळलेले रापुजो बघून तुमचेही डोळे विस्फारतील ही प्रभावळकरांच्या अभिनयाची ताकद आहे. विकास कदम, दीपक शिर्के, राजन ताम्हाणे, शीतल क्षीरसागर सगळ्यांनीच काम नेहमीप्रमाणे मनापासून केलेली आहेत. पण सगळ्यात कमाल केलीये ती सुहास जोशी यांनी. आपल्या पतीचं निधन झालंय हेच त्यांना मान्य नाहीये, त्यांच्या मनावर आघात झालाय, पण त्या कुठेही मनोरुग्ण वाटत नाहीत हे त्यांच्या अभिनयाचं यश आहे. या सिनेमाच्या निमित्तने ब-याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर सुहास जोशी यांचा सशक्त अभिनय बघायला मिळालाय. एकूणात, अभिनयाने सजलेला पण मांडणीत फसलेला असं या रापुजोचं वर्णन करता येईल.

रेटिंग : रामचंद्र पुरुषोत्तम जोशी -40

close