रिक्षा भाड्यातील दरकपातीला रिक्षाचालकांचा विरोध

February 3, 2009 8:51 AM0 commentsViews: 5

3 फेब्रुवारीनिवडणुका तोंडावर आल्यानं सरकारनं रिक्षाची दरकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पण महागाईचा विचार करता दरकपात करणं शक्य नसल्याचा पवित्रा पुणे-मुंबईतल्या रिक्षा संघटनांनी घेतलाय. ही दरकपात व्हावी अस प्रवाशांचं मत आहे.पुण्यातल्या रिक्षा भाड्यात 25 टक्क्यांची वाढ गेल्यावर्षी जूनमध्ये करण्यात आली होती. संभाव्य पेट्रोल भाववाढ लक्षात घेऊन ही भाडेवाढ करण्यात आली होती. पण आज पेट्रोलचे दर कमी झाले तरीही रिक्षा संघटनांनी भाडेकपात केली नाही. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारनं हा निर्णय घेतल्याचा आरोपही संघटना करत आहेत. "महागाई कमी झालेली नाही. फक्त रिक्षा भाडे कमी करून चालणार. महागाई कमी झाल्यास रिक्षा भाडे कमी करण्यास तयार आहोत" असं महाराष्ट्र रिक्षासेनेचे अध्यक्ष नाना क्षिरसागर यांनी सांगितलं.पेट्रोलचे दर वाढल्यानंतर रिक्षावाल्यांनी तातडीनं भाडेवाढ करून घेतली. आता पेट्रोलचे दर दोनदा कमी झालेत. त्यामुळं भाडेकपात झाली पाहिजे, असं प्रवासी संघाचं मत आहे. "भाडे कपात झालीच पाहीजे. सेवा दिल्यानंतर नागिराकांचा विचार होणं गरजेचं आहे. नागरिक संघटीत नाही याचा फायदा रिक्षावाल्यांनी घेऊ नये." अशी प्रतिक्रिया पीएमपी प्रवासी संघाचे कार्यकर्ते जुगल राठी यांनी दिली.एकीकडे पुण्यात हा वाद सुरू आहे, तर नवी मुंबईतही सध्या रिक्षाचालक आणि प्रवाशांमध्ये भाड्यावरून वाद सुरू आहेत. ठाणे आणि मुंबईच्या तुलनेत नवी मुंबईत रिक्षाचं मिनीमम भाडं 2-3 रुपयांनी जास्त आहे. पेट्रोलचे दर कमी झाले पण रिक्षांच्या भाडे दरात मात्र कपात झालेली नाही. नवी मुंबईत गेल्या आठवड्यात रिक्षा संघटनेनं रिक्षा भाडे कमी करत असल्याचं सांगितलं होतं. मात्र असं झालं नाही त्यामुळं प्रवासी आणि रिक्षा ड्रायव्हर्समध्ये बर्‍याचदा वादावादी होत आहे.भाडेवाढ करण्यासाठी आघाडीवर असलेले रिक्षावाले आता दर कपात करण्यास तयार नाहीत. त्यामुळं नागरिक मात्र वेठीस धरले जात आहेत.

close