…तर वेगळा विचार करावा लागेल -आठवले

October 7, 2013 5:53 PM0 commentsViews: 1284

07 ऑक्टोबर : ‘शिवसेना-भाजपनं आम्हाला टाळून सत्तेची स्वप्न पाहू नयेत. जर नोव्हेंबरपर्यंत आमच्यासाठी राज्यसभेची जागा दिली नाही, तर वेगळा विचार करावा लागेल असा इशारा पुन्हा एकदा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी युतीला दिला. तसंच आगामी पाच राज्यातल्या निवडणुकीत रिपाई मित्रपक्षाच्या शोधात असल्याचंही रामदास आठवले यांनी सांगितलंय. ते सांगलीत बोलत होते.

 

आमच्या पक्षात गट-तट असतील पण रिपाई सर्व स्तराला काम करतेय. आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर रिपाईच्या सोबत असणार्‍या पक्षाचा विजय झालाय त्यामुळे युतीने या रिपाईला सोडून असा विचार करू नये असंही आठवले म्हणाले. अलीकडेच जागा वाटपाच्या मुद्यावर आठवलेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. शिवसेना आणि भाजपने लोकसभेसाठी 3 जागा रिपाईला देण्याची तयारी दाखवलीय. मात्र राज्यसभेची जागा भाजपकडून घ्यावी असा सल्ला ठाकरेंनी दिला. जर उद्धव ठाकरेंनी सांगितलं तर आम्ही जागा देण्यासाठी तयार आहोत अशी भूमिका गोपीनाथ मुंडेंनी मांडली.

 

 

मात्र एकीकडे जागावाटपावरून चर्चा सुरू असताना आठवले बसपासोबत हातमिळवणी करणार अशी चर्चा सुरू झाली होती तसे संकेतच आठवलेंनी दिले होते. पण आठवले बसपासोबत युती करणार नाही. त्याबद्दल माझं आणि त्यांचं बोलणं झालं आहे अशी माहिती मुंडेंनी दिली. एकंदरीतच महायुती झाल्यापासून मनसे-शिवसेना एकत्र होण्याची चर्चा असो अथवा जागा वाटपाचा मुद्दा प्रत्येक वेळी आठवलेंनी महायुती तोडण्याचा जाहीरपणे इशारा दिलाय मात्र युतीने त्याला कोणताच खास प्रतिसाद दिला नाही त्यामुळे आठवलेंची इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती झालीय.

close