उकीरड्यावर काम करणार्‍या ‘भगिनीं’च्या सुरक्षेची कहाणी !

October 7, 2013 10:48 PM0 commentsViews: 97

दीप्ती राऊत, मुंबई
07 ऑक्टोबर : उकीरड्यावरचं जगणं कुणाला नको असतं. मुंबईतल्या कचरा वेचणार्‍या महिलांच्या वाट्याला आलंय उकीरड्यावरच पोट भरणं. आजही त्यांच्या आयुष्यातला कचरा कायम आहे, पण सोबत आलंय सुरक्षित जगणं आणि सन्मानाचं जगणं. हा बदल घडलाय परिसर विकास भगिनी संघाच्या माध्यमातून..

घाण आणि दुर्गंधी त्यांच्या पाचवीलाच पुजलेली…सोबतच असुरक्षित, असंघटित आणि लाजिरवाणं जगणं. स्त्री मुक्ती संघटनेच्या परिसर विकास भगिनी संघानं मात्र ते बदलून दाखवलं .घाण गेली, दुर्गंधी गेली..त्याच्या जागी मास्क आले आणि ग्लोव्हज…सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानाचं जगणं.
सुरुवातीला गटांच्या माध्यमातून या संघटित झाल्या. सोसायट्यांपासून खाजगी संस्थांपर्यंत त्यांनी बोलणी सुरू केली. ओला-सुका कचरा वेगळा ठेवणं, सुका कचरा रिसायकलींगसाठी पाठवणं आणि ओल्या कचर्‍यातून खत, बायोगॅस तयार करणं असे वेगवेगळे उपक्रम.

 
घरातून बाहेर टाकलेला कचरा कचरा डेपोवर नेऊन डंप करायचा ही सगळीकडची प्रचलित पद्धत. पण या इथेच थांबल्या नाहीत. त्यांनी गोळा केलेल्या कचर्‍यापासून खत तयार केलं आणि तेव्हाच कचरा विघटनाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली. कचरा विघटनाची विकेंद्रीत प्रक्रिया ही यामागची भूमिका. कचरा वेचणार्‍या महिलांचं संघटन, सुरक्षा आणि सबलीकरण हा प्रवास.

 
खरं तर कचर्‍याच्या समस्येवर घराघरापासून थेट शासनापर्यंत प्रत्येकानं विचार आणि कृती करण्याची गरज आहे.यात महत्त्वाची भूमिका निभावणार्‍या या माहिलांनी त्यांच्यापासून सुरुवात केलीए. आता प्रश्न आहे, आपण काय करणार याचा?

close