केरनमध्ये लष्कराची मोहीम फत्ते, 15 दहशतवादी ठार

October 8, 2013 3:28 PM0 commentsViews: 529

shrinager firing08 ऑक्टोबर : जम्मू आणि काश्मीरमध्ये केरन सेक्टरमध्ये गेल्या 15 दिवसांपासून लष्कर आणि दहशतवाद्यांदरम्यान सुरू असलेली चकमक अखेर संपली आहे. शाला बाटूमध्ये 30-40 दहशतवाद्यांनी घुसखोरी केली होती. चकमकीत 15 दहशतवादी मारले गेल्याचा दावा लष्करानं केलाय.

 

जम्मू आणि काश्मीरमध्ये केरन सेक्टरमध्ये शाला बाटू या गावात 23 सप्टेंबरला नियंत्रण रेषेपलीकडून 30 ते 40 दहशतवाद्यांनी घुसखोरी केली होती. त्यांना हुसकून लावण्यासाठी लष्कराने 15 दिवस मोहिम राबवली अखेरीस त्यांना यात यश आलं.

 

कारगील नंतरची नियंत्रण रेषेवरची ही सर्वात मोठी घुसखोरी होती. इथल्या चकमकीचा फटका केरन सेक्टरमधल्या गावांना बसलाय. जामगुंडचे गावकरी तर गाव सोडून पळून गेलेत. दुसरीकडे पाकिस्ताननं मात्र घुसखोरीची बातमी निराधार असल्याचं म्हटलंय. दरम्यान,सोमवारी संध्याकाळी केरन भागात मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. लष्करानं केलेल्या कारवाईत हा सगळा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. या कारवाईत 7 एके 47 रायफल्स, रेडिओ सेट्स, पिस्तुलं बंदुकीच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

close