‘सर्वच साखर कारखान्यांची न्यायालयीन चौकशी करा’

October 9, 2013 5:48 PM1 commentViews: 563

Image anna_on_politce_300x255.jpg09 ऑक्टोबर : राज्यातल्या 40 सहकारी साखर कारख्यान्यांच्या विक्रीची न्यायालयीन चौकशी करावीच पण त्यासोबत सर्वच कारखान्याची चौकशी करावी आणि 60 कारखान्यांची राज्य बँकेनं सुरु केलेली विक्री प्रक्रिया थांबवावी अशी मागणी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली.

 

साखर कारखान्यांच्या खरेदी-विक्रीवरून होत असलेल्या आरोपांमुळे सध्या सहकार क्षेत्र चांगलंच ढवळून निघालंय. राज्यातल्या 40 सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केल्यानंतर अण्णा हजारे आणि मेधा पाटकर यांनी आज मुंबईत जाहीर सभा घेतली.

 

यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, माजी आमदार माणिक जाधवसुद्धा सहभागी झाले होते. सर्वपक्षीय संगनमतानं साखर कारखाने आजारी पाडून ते हितसंबंधातल्या संस्थांना विकले गेल्याचा आरोप सर्वांनी केला. 40 सहकारी साखर कारख्यान्यांच्या विक्रीची न्यायालयीन चौकशी केली जावी. तसंच आणखी 60 कारखान्यांची राज्य बँकेनं सुरू केलेली विक्री प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी अण्णांनी केली. या महाघोटाळ्याच्या विरोधात जेलभरो आंदोलन करण्याची घोषणाही अण्णांनी केलीये.

 

सभेनंतर मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार होता. पण त्याआधीच मुख्यमंत्र्यांनी चर्चेचा निरोप अण्णा हजारे आणि मेधा पाटकरांना पाठवला. या सभेनंतर सह्याद्री अतिथीगृहावर अण्णांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. या बैठकीत अण्णा आणि त्यांच्या शिष्टमंडळानं मागण्यांचं निवेदन सादर केलं. मुख्यमंत्र्यांशी 45 मिनिटं चर्चा केली. अण्णांच्या मागण्यांवर 15 दिवसांनी आढावा बैठक घेण्याचं मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं.

 

 • Chandrashekhar Gosavi, Pune

  होय, चौकशी होणे गरजेचे आहे आणि
  खालील प्रश्न तर प्राधन्याने घेतले पाहिजेत.

  १. मुळात साखर कारखाने तोट्यात का
  गेले ह्यचिच अगोदर चौकशी व्हायला हवी?

  २. जर राजकीय नेते ही साखर कारखाने
  विकत घेवु शकतात तर सहकारी तत्वावर का चालवु शकत नाहीत?

  ३. जिल्हा बॅंका जेंव्हा निविदा
  काढतात तेंव्हा हिच नेते मंडळी बॅंकेशी साटेलोटे करुन घेतात. जिल्हा बॅंका व कारखाने
  विकत घेणारी मंडळी कामगार व शेतक-यांचा विचारही करीत नाहीत कारण माहिती आहे ह्या लोकांच्या
  नेते मंडळींना मॅनेज केले की झाले काम.

close